वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २५ : (विषारी साप) पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २५ : (विषारी साप) पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २५ : (विषारी साप) पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक


  • पोवळा / स्लेंडर कोरल स्नेक (slender Coral snake)

 पोवळा हा वाळा सापासारखा पण त्यापेक्षा काहीसा मोठा व रंगसंगतीत आकर्षक साप आहे. याची नावे प्रत्येक राज्यात वेगवेगळी असली तरी महाराष्ट्रात याला पोवळा या नावाने ओळखले जाते. हा विषारी असून याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, चावलेल्या भागात वेदना होणे, अशी लक्षणे दिसतात.  वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. तथापि  माणूस मेला असे अद्याप घडलेले नाही. कारण आकाराने फार लहान असल्याने सहसा चावत नाही. किंवा तोंड आणि दात अत्यंत बारीक असल्यामुळे माणूस किंवा मोठ्या प्राण्यांना त्याला चावता येत नाही. आपल्या तळहातावर चावू शकत नाही. तथापि त्वचा मऊ असलेल्या ठिकाणी चावू शकतो. पण विषाची मात्रा कमी असते. 
  लहान आकारामुळे तो इतर वन्य प्राणी, पक्षी यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. हा साप लाजाळू आहे. मुख्यतः दगडांच्या फटी, माती, वाळलेल्या पालापाचोळ्यात याचे वास्तव्य असते. हा निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा निदर्शनास येत नाही. महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतभर आढळत असला तरी  अत्यंत दुर्मिळ आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्यूल दोन मध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे.
पोवळा सापाच्या प्रजातीतील आणखी एक साप आहे तो म्हणजे पट्टेरी पोवळा याचे शास्त्रीय नाव  Calliophis Intestinalis तो ही विषारी असून सर्व बाबतीत पोवळा सारखा असला तरी रंगाच्या बाबतीत त्याचे वेगळेपण आहे. तोंडाचा रंग वेगळा आणि त्याच रंगाचे शेपटीवर दोन आडवे पट्टे त्यालाही असले तरी पाठीवर दोन्ही बाजूला तोंडापासून शेपटीपर्यंत पांढरे पट्टे असतात त्यामुळे त्याला पट्टेरी पोवळा असे नाव पडले आहे. काळतोंड्या, पोवळा व पट्टेरी पोवळा या सापांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे या सापाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. हा साप निदर्शनास आल्यास त्याला चुकूनही मारू नये. अशावेळी तात्काळ सर्पमित्रांना बोलावून घ्यावे. 
  पोवळा साप  सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे  रमेश आमले यांच्या घराच्या अंगणात तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे मे २०१८ मध्ये गुरुदत्त कॉलनीतील मधुकर पाटील यांच्या घराशेजारी सापडला दोन्ही वेळेला संबंधित पर्यावरण प्रेमी जागरुक नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावून त्यांच्यामार्फत या दुर्मिळ सापाची माहिती घेऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. 
  याची लांबी जास्तीत जास्त ५४ सेमी व घेरी एक ते दीड सेंटिमीटर  असते. याच्या शरीराचा रंग तपकिरी, मातकट व तांबूस करडा असतो. डोके व मान काळे  तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात पोटाचा रंग तांबूस असतो. लांबट सडपातळ असतो. त्याला डिवचले किंवा पकडण्याचा प्रयत्न केला तर शेपटी वर करून खवल्यांचा रंग लाल करतो.  महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पोवळा सापडल्याच्या नोंदी आहेत. या सापाची मादी वाळलेल्या पालापाचोळा किंवा दगडांच्या सपाटीत दोन ते सात अंडी घालते. 
( हुबेहूब या सापासारखाच दिसणारा काळतोंड्या सापाची माहिती आपण पहिली आहे. काळतोंड्या सापाचे केवळ तोंड काळे असते. पण पोवळा सापाचे तोंड आणि शेपटी कडील शेवटच्या भागावर दोन आडवे काळे पट्टे असतात. यावरून दोन्ही साप वेगळे ओळखता येतात. )
 आपल्या देशातील संपन्न जैवविविधतेचे संगोपन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे 'दिसला साप कर ठार' ही प्रवृत्ती सोडून असे दुर्मिळ साप निदर्शनास आल्यास त्याच्यावर नजर ठेवून नजीकच्या सर्पमित्रांना तात्काळ पाचारण करावे. यामुळे पर्यावरणीय जैविक विविधतेत भर घालणारे मोठे भाग्य आपल्याला मिळू शकेल.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment