सोनपावलानी आलेल्या गौराईचे चंदगड तालूक्यात स्वागत, पण उत्साहावर कोराणाचे सावट - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2020

सोनपावलानी आलेल्या गौराईचे चंदगड तालूक्यात स्वागत, पण उत्साहावर कोराणाचे सावट
तेऊरवाडी -संजय पाटील

चंदगड तालूक्यात कोरोनाच्या संकटामुळे विघ्नहर्ता गणरायाचे जसे जोरदार स्वागत झाले नही अगदी तसेच गौराई चे पण झाले .  महिलावर्ग आनंदाने पुजणाऱ्या गौरींचेही आज मंगळवार (दि.२५) घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. गौरी आणताना ‘आली गवर आली, सोनपाऊली आली’, असे म्हणत गौराईला घरी आणताना नेहमीचा उत्साह दिसून आला नाही .

सर्वांचा विघ्नहर्ता असणाऱ्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे गौराई च्या आगमनाची चाहूल लागली होती. यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासून पूर्वतयारीच्या  कामात मग्न होत्या. आज  सकाळपासूनच सर्व महिला गौरींच्या स्वागतासाठी आतूर झाल्या होत्या. गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. गौरीला सजविण्यासाठी, तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळेच गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला. गेल्या चार-पाच दिवसांपासून घराघरांमध्ये मिष्टान्न तयार करण्याची लगबगही सुरू होती. घराघरांत गौरींची उत्साहात पूजा करण्यात येत आहे. या गौराईला भाकरी व पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला . या बरोबरच गौरींना बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ, हार तसेच सोन्याचे विविध प्रकारचे दागिने घालून व काही ठिकाणी  छानशी साडी नेसवून  सजवण्यात आले. उद्या गौरींचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी काही घरांत पुरणाच्या पोळीच्या नैवेद्यासोबत जेवणाचा बेत आखण्यात येणार असून, वेगवेगळ्या कुटुंबांतील परंपरेनुसार गोड, तिखटाचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, गौरीच्या आगमनाबरोबरच घरात झिम्मा फुगडी, बस फुगडी आदी महिलांचे विविध खेळ मात्र कोरोनामुळे काहीसे मंदावणार असून, घरोघरी आलेल्या माहेरवाशिणींसोबत रात्र जागविण्याची परंपरा मात्र यावेळी खंडीत झाली आहे. कारकूर काटेल , गणोबा भेटेलं अशी  पारंपारीक गाणी कोरोणामुळे यावेळी चंदगड तालूक्यात ऐकायला मिळाली नाहीत .
गौरी बरोबर गणपती घरी येणे म्हणजे म्हणजे एकप्रकारे सुखसमृद्धी घरी येणे मानले जाते. त्यामुळेच गौरींच्या आगमनाच्या दिवशी गौरींच्या मुखवट्यावर तांदूळ, पाणी  ओवाळून टाकले जाते. त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत नेऊन तिला संपूर्ण घर दाखविण्यात येते. ही परंपरा पार पाडताना काही महिलांनी ‘गौरी गौरी कुठे आलात’ असे विचारून तर काही महिलांनी ‘मी माझ्या माहेरी आले’ असे सांगत गौरीचे स्वागत केले.एकंदरीत कोरोनाच्या सावटाखाली चंदगड तालूक्यात गौराईचे आगमण झाले .

No comments:

Post a Comment