चंदगड : महापुराच्या शक्यतेने नागरिक भयभीत, धरणांतील पाणीसाठा ९३ टक्के; मुसळधार सुरुच; हेरेत सर्वाधिक २३७ मिलिमीटर पावसाची नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

चंदगड : महापुराच्या शक्यतेने नागरिक भयभीत, धरणांतील पाणीसाठा ९३ टक्के; मुसळधार सुरुच; हेरेत सर्वाधिक २३७ मिलिमीटर पावसाची नोंद

किटवाड ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यामुळे कालकुंद्री ते कुदनुर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
           चंदगड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सहा मंडलात एकूण ९३० मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा यंदाचा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढतच असून तालुक्‍यातील ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. तालुक्यातील बहुतांशी बंधारे पाण्याखाली असून वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तालुक्यातील एकूण २३ पैकी १० प्रकल्प तुडुंब भरले आहेत. 
         आज बुधवार सकाळी आठ वाजेपर्यंत  पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे  प्रकल्पांत ९३.१८ टक्के साठा झाला आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढ सुरू असून येत्या दोन दिवसात सर्वच बंधारे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. घटप्रभा- फाटकवाडी व झांबरे-उमगाव हे दोन मध्यम प्रकल्प  पूर्वीच भरले असून जंगमहट्टी ८३.६१ टक्के भरला आहे. लघुपाटबंधारे पैकी जेलुगडे, कळसगादे, सुंडी,किटवाड नं १, किटवाड नं २ , पाटणे व काल दिंडलकोप प्रकल्प  शंभर टक्के भरला. उर्वरित लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी आज अखेर झालेला पाणीसाठा आंबेवाडी ८९.२९, हेरे- ७७.४५, करंजगाव- ४४.११, खडक ओहोळ- ४१.३५, लकीकट्टे- ८२.९२, कुमरी ६०.६२, निटुर नं.२- ५४,  काजिर्णे- ९७.०२ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय चंदगड तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या चार बंधाऱ्यात आजचा पाणीसाठा पुढील प्रमाणे; निट्टूर नं. १- ६८.२३,   मलतवाडी- ७०.३३  तर कुदनुर व  हलकर्णी तलाव १०० टक्के भरले आहेत.
            तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड १९६ (१४४५), नागणवाडी १४३ (११९२),  माणगाव ९१ (३८५), कोवाड ८७ (६०६),  तुर्केवाडी १७६ (११६७), हेरे २३७ (२२४२), चोवीस तासातील एकूण पाऊस ९३० तर सरासरी पाऊस १५५ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ७०३७ तर सरासरी पाऊस ११७२ मिलिमीटर इतका झाला आहे. संपूर्ण तालुक्यात विविध भागात ओढे नाल्यांचे पाणी शिवरात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
           गतवर्षी चार ऑगस्टपासून पावसाने तालुक्यात थैमान घातले होते त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी पुन्हा एकदा होत असल्याचे चित्र असून यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते दड्डी हत्तर्गी रस्त्याला जोडणारा मार्ग कालकुंद्री ते कुदनुर, तळगुळी, राजगोळी मार्गावर ओढ्यांचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान ताम्रपर्णी नदी चे पाणी कोवाड बाजारपेठेत घुसल्यामुळे दुकानदार व नागरिकांची दुकाने व घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तारांबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment