सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ११ (बिनविषारी साप) धामण/धामीन Rat snake (Ptyas mucosus) - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ११ (बिनविषारी साप) धामण/धामीन Rat snake (Ptyas mucosus)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका 
धामण/धामीन
 शेतातील पिकांचे संरक्षण करणारा शेतकऱ्यांचा खात्रीलायक मित्र म्हणजे धामण (धामीन)साप होय. हा एक बिनविषारी साप असून  याचे शास्त्रीय नाव टायास म्युकोसस  आहे.  हा भारतात सर्वत्र  आढळतो. हा सपाट प्रदेशात राहणारा असला, तरी १,८०० मीटरपेक्षाही जास्त उंचीवरही राहतो.

चपळाई आणि लांबी मुळे भीतीदायक वाटतो. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी दोन ते तीन मीटर व घेर  १० सेंमी पर्यंत असतो. शेपूट एकूण लांबीच्या २५ टक्के व टोकदार असते. डोके लांबट असून बारीक मानेपासून  स्पष्टपणे वेगळे असते. डोळे लकाकणारे व मोठे असतात. धामीन चा रंग पिवळसर हिरवट किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीरावरील खवल्यांच्या काळ्या कडांमुळे पाठीवर जाळे असल्यासारखे दिसते. पोट पांढरट किंवा पिवळसर असते आणि गळ्याजवळ पिवळा रंग जास्त स्पष्ट असतो.

धामण सर्व प्रकारच्या परिस्थितींत आढळणारा नेहमी दिसणारा साप आहे. घरांच्या जवळपासही तो दिसतो. मनुष्यवस्तीत दिवसा तो एखाद्या सुरक्षित जागी लपून बसतो; पण वस्ती नसलेल्या ठिकाणी तो निर्भयपणे दिवसा हिंडत असतो. जुन्या पडीक भिंती, झाडेझुडपे, कुजणारा पालापाचोळा, भातशेते वगैरे ठिकाणी तो असतो. तो उत्तम पोहणारा असून झाडांवर ही चढण्यात तरबेज आहे. पाण्याच्या जवळपास राहून तो बेडूक खातो. त्याचप्रमाणे झाडावर चढून पक्षी आणि त्यांची अंडी खातो. घुशी आणि उंदीर हे त्याचे नेहमीचे खाद्य आहे. 

माणसांपासून दूर राहणे पसंत करतो. त्याला मारण्यासाठी कोंडीत पकडल्यास त्वेषाने हल्ला चढवताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून तो प्रहार करू शकतो, किंवा चावतो. पुष्कळ मोठा व भयंकर दिसणारा असला, तरी तो मुळीच विषारी नाही. हा चपळ व वेगवान हालचाली करतो, वेगात पळतो.

या सापासंबंधी बरेच गैरसमज प्रचलित आहेत. धामण हा नागांचा नर आहे, गायीचे किंवा म्हशीचे स्तन तोंडात धरून तो सगळे दूध चोखून घेतो. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला चावला, तर तो माणूस आंधळा होतो इ. तथापि या सर्व समजुती निराधार आहेत.
हा अंडी घालणारा साप असून पावसाळयात अंडी फोडून पिल्ले बाहेर पडतात. शेतातील उंदरांनी तयार केलेल्या बिळात किंवा झाडांच्या मुळांच्या पोकळ भागात, कपारीत जास्त राहतो. शेतातील पिकांचे किंवा साठवलेल्या धान्याचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन वर्षाकाठी हजारो टन धान्याचे रक्षण करतो. धामण सापांचे संरक्षण म्हणजे उत्पादनात वाढ असे समजण्यास हरकत नाही.


सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

**शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

संपर्क : ९५५२०४००१५ / ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment