महापुराच्या धास्तीने कोवाड वासीय भयभीत, नदीकाठचे नागरिक व व्यापाऱ्यांची उडाली धांदल - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

महापुराच्या धास्तीने कोवाड वासीय भयभीत, नदीकाठचे नागरिक व व्यापाऱ्यांची उडाली धांदल

कोवाड मधील ताम्रपर्णी नदीच्या पाण्याच्या पातळी मध्ये वाढ होत असल्याने पाण्यात अर्धे बुडालेले मंदिर.
कोवाड / सी एल वृत्तसेवा
         पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या कोवाड येथील बाजारपेठेतील सर्व व्यापारी धास्तावले आहेत.
        चंदगड तालुक्यातील 24 प्रकल्पापैकी 9 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.मंगळवारी दुपारपर्यंत तालुक्यात 52 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पुढील पाच दिवस पाऊस असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मागील वर्षी 3 ऑगष्ट ला न भूतो न भविष्यती असा महापुराला सुरुवात होऊन 13 ऑगस्ट पर्यंत सगळीकडे महापुराने थैमान घातले होते.त्या आठवणी ताज्या असतानाच कोरोनाने थैमान घातले आणि आता पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे कोवाड येथील नागरिक तसेच व्यापारी वर्गाने भलतीच धास्ती घेतली आहे.भविष्यातील धोका ओळखून सर्व व्यापारी वर्ग आपले दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी पोचविव्यात गुंतलेले आहेत.प्रशासनाने देखील त्यासंदर्भातील सूचना यापूर्वीच सर्वांना दिल्या असून संपूर्ण ताम्रपर्णी नदीकाठावरील सर्व गावांना प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि तहसीलदार विनोद रणावरे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे .अनावश्यक कारणासाठी बाहेर न पडता घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.संभाव्य पुरस्थितीचा आराखडा तयार केला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले आहेत.ज्या ज्या गावात पुराचे पाणी येऊ शकते अश्या गावातील संभाव्य पुरबाधित कुटुंबांची यादी तयार करून त्यांना प्रशासन योग्य ते सहकार्य करणार असल्याचे प्रांताधिकारी पांगारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment