चंदगड तालुक्यात ढगफुटीमुळे पुरपरिस्थिती, अनेक बंधारे पाण्याखाली, वाहतुक विस्कळीत, वादळामुळे घरांचे लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2020

चंदगड तालुक्यात ढगफुटीमुळे पुरपरिस्थिती, अनेक बंधारे पाण्याखाली, वाहतुक विस्कळीत, वादळामुळे घरांचे लाखोंचे नुकसान

हेरे व चंदगड मंडलमध्ये सर्वांधिक पावसाची नोंद 
ढगफुटीमुळे चंदगडच्या काॅलेज रोडवर आलेले पुराचे पाणी. 
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
       गेले तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक मार्ग वाहतुकीला बंद झाले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील पुरस्थितीवर नजर ठेवली जात आहे. चंदगड तालुक्यातील प्रमुख ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. चंदगड तालुक्यातील अनेक पुल व बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात १५५ मिलीमीटर तर आतापर्यंत तालुक्यात सरासरी 1172.83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीसोबत वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड होवून लाखोंचे नुकासान झाले आहे. विजेचा लंपडाव सुरु असून अनेक गावे गेले तीन दिवस अंधारात आहेत. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने संपर्क तुटला आहे.
पुरामुळे चंदगडचा जुना पुल पाण्याखाली गेला आहे. 
      तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड व माणगाव हे बंधारे पाणीखाली गेले आहेत तर घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजुर, भोगोली, हिंडगाव गवसे, कानडी-सावर्डे, अडकूर व तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. बेळगाव वेंगुर्ला राज्य महामार्गावर दाटे गावाजवळ महापुराचे पाणी दुपारी दोन वाजता आल्याने वाहतुक ठप्प आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. बेळगाव-वेगुर्ला मार्गावर पुद्रा व कानुर खुर्दजवळ राज्य महामार्गावर पाणी आल्याने वाहतुक बंद आहे. 
बेळगाव-वेगुर्ला मार्गावर दाटे येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
      सकाळच्या वेळी चंदगड जांबरे रोडवर किरमटेवाडी कोकरे गावाजवळ पुलावरून आलेले पाणी आल्याने चंदगड रोड काही काळ बंद होता. आज ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी हल्लारवाडी व चंदगड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोवाड येथील ताम्रपणीँ नदीच्या पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने जुना पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नवीन पुलावरून वाहतुक सुरळीत चालू आहे. करंजगाव बंधारावर पाणी आले आहे रस्ता बंद आहे. गणूचीवाडी बंधारा पाणी आल्याने वाहतुक ठप्प आहे. 
बेळगाव-वेगुर्ला मार्गावर दाटे येथे राज्य महामार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. 
           अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान
मौजे भोगोली येथील बाबू भाऊ चौगुले यांच्या घरावर झाड पडून 25000 चे नुकसान, मौजे हाजगोळी येथील धनाजी यशवंत चव्हाण यांच्या गोठ्याची भिंत पडून 50000 चे नुकसान. मौजे खालसा गुडवळे येथील शिवाजी भिकू गावडे यांचे घरावर झाड पडून घराची कौलं व वासे आणी घरात पावसाचे पाणी जाऊन 12 पोती धान्य भिजून अंदाजे 50000/-रुपये नुकसान झाले आहे.  
मौजे खा गुडवळे येथील शिवाजी भिकू गावडे यांचे घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. 
मंडलनिहाय पाऊस असा – चंदगड (196), नागनवाडी (143), माणगाव (91), कोवाड (87), तुर्केवाडी (176), हेरे (237). 


No comments:

Post a Comment