![]() |
चोरट्याने कापलेली मुख्य दरवाजाची कडी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड वरील छत्रपतींनीच साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या भगवती भवानी मंदिरात काल दि. १६/०८/२०२५ रोजी रात्री धाडसी चोरी झाली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कुलूप लावलेली कडी कटरने कापून मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यातील मूर्तीच्या डोक्यावरील सोन्याचा मुकुट, चांदीचा घोडा, गाभाऱ्याच्या बाहेर चौकटी समोरील स्तंभावर ठेवण्यात आलेल्या मोठ्या पादुका तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकारामुळे शिवप्रेमी पर्यटक, भाविक व सर्वसामान्य नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती समजतात चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूरवरून हून ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस पथकाने सखोल चौकशी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत. गेल्या काही दिवसात चोरट्यांनी तालुक्यातील कुलूप बंद घरांबरोबरच मंदिरांनाही लक्ष केले आहे. आठ दिवसापूर्वीच तालुक्याच्या पूर्व भागातील कल्याणपुर येथील गावातील दुर्गाडी लक्ष्मी मंदिरात मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रकमेसह देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. सहा सात महिन्यात या मंदिरात ही दुसऱ्यांदा चोरी झाली होती. या चोरट्यांचा छडा लावून त्यांना कठोर शिक्षा करावी. अशी मागणी पर्यटक व शिवप्रेमींसह व ग्रामस्थांतून होत आहे.
No comments:
Post a Comment