चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही वर्षात नजीकच्या जंगलातील वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. हातातोंडाशी आलेली पिके रानडुक्कर, गवे व इतर वन्यप्राणी फस्त करत आहेत. परिणामी वर्षभर राबून, खते, मजुरीचे पैसे खर्च असे हजारो रुपये खर्च करून काढलेली पिके नाहीशी होत आहेत. यामुळे पश्चिम भागातील शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आले आहेत. यामुळे वैतागलेल्या बिजूर भोगोली येथील शेतकऱ्यांनी सततचे पंचनामे करत बसण्यापेक्षा वन विभागाने शेतकऱ्यांना सरसकट दरवर्षी एकरी ५० हजार रुपये खंड द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केले आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच चंदगड वनक्षेत्रपाल यांना देण्यात आले.
चंदगड तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिम भागातील गरीब शेतकरी शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. शेतीव्यतिरिक्त अन्य कोणताही उद्योग व्यवसाय नसल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न हेच उपजीविकेचे साधन आहे. भात, नाचना आणि ऊस ही येथील मुख्य पिके असली तरी जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पण शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई नगण्य असते. त्यासाठीही वन विभागाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अक्षरश शेतकऱ्यांवर भिके कंगाल होण्याची वेळ आली आहे. परिणामी येथील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
यावर एक पर्याय शेतकऱ्यांनी शोधून काढला आहे. तो म्हणजे वन विभागाने प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५० हजार रुपये प्रमाणे दरवर्षी खंड द्यावा. अशा आशयाचे निवेदन नुकतेच वन विभागाला दिले आहे. निवेदनावर सरपंच जगन्नाथ गावडे, रमेश चौगुले, शाहू तेजम, बाळू पाटील, भिकू कांबळे, शिवाजी पाटील, बाबू गावडे, विष्णू गावडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
हीच परिस्थिती सध्या चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात वैजनाथ डोंगर, चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी डोंगर परिसर, दिंडलकोप, किटवाड, होसूर, कालकुंद्री अशा परिसरात असून शेतकऱ्यांचा हजारो टन ऊस तयार होण्यापूर्वीच डुकरांनी नुकसान केला आहे. तर काढणीवर आलेली रताळी अक्षरशः नांगरून टाकली असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे वैतागलेल्या शेतकरी वर्गातून डुकरांच्या शिकारीला शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment