तालुक्यातील २३ पैकी १४ प्रकल्प ओहरफ्लो, अनेक घरांची पडझड पुराच्या पातळीत वाढ सुरूच, अनेक मार्ग अद्यापही पाण्याखालीच - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

तालुक्यातील २३ पैकी १४ प्रकल्प ओहरफ्लो, अनेक घरांची पडझड पुराच्या पातळीत वाढ सुरूच, अनेक मार्ग अद्यापही पाण्याखालीच

कालकुंद्री - कागणी मार्गावर आलेले ताम्रपर्णी नदीचे पाणी. (फोटो : श्रीकांत  पाटील, कालकुंद्री)
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
        चंदगड तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सहा मंडलात एकूण  ८७१ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर किंचितओसरला असला तरी तालुक्यातील ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्यांच्या  पातळीत वाढ सुरूच आहे. तालुक्यातील बहुतांशी बंधारे पाण्याखाली असून वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तालुक्यातील एकूण २३ पैकी १४ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. आज बुधवार सकाळी आठ वाजेपर्यंत  पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे  प्रकल्पांत ९६.८८ टक्के साठा झाला आहे. पाणीपातळीत झपाट्याने वाढ सुरू असून येत्या दोन दिवसात दोन तीन वगळता सर्व बंधारे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. घटप्रभा- फाटकवाडी, झांबरे-उमगाव, जंगमहट्टी हे तिन्ही मध्यम प्रकल्प  पूर्ण भरले असून विसर्ग सुरू आहे. लघुपाटबंधारे पैकी आंबेवाडी, जेलुगडे, कळसगादे, सुंडी, किटवाड नं १, किटवाड नं २ , पाटणे, दिंडलकोप, काजिर्णे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पांत आज अखेर झालेला पाणीसाठा  हेरे- ८७.६५, करंजगाव- ४५, खडकओहोळ- ४४, लकीकट्टे- ८८.१५, कुमरी ६६.८०, निटुर नं.२- ५९.७१  टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय चंदगड तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील चार पैकी कुदनुर व  हलकर्णी तलाव १०० टक्के भरले आहेत तर निटूर नं १ व मलतवाडी भरण्याच्या अवस्थेत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड १७१ (१६१६), नागणवाडी १४८ (१३४०),  माणगाव ११६ (५०१), कोवाड ५४ (६६०),  तुर्केवाडी १५४ (१३३५), हेरे २१४ (२४५६), चोवीस तासातील एकूण पाऊस ८७२ तर सरासरी पाऊस १४५ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ७९०८ तर सरासरी पाऊस १३१८ मिलिमीटर इतका झाला आहे. संपूर्ण तालुक्यात विविध भागात ओढे नाल्यांचे पाणी शिवरात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
  गतवर्षी चार ऑगस्टपासून पावसाने तालुक्यात थैमान घातले होते त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी पुन्हा एकदा होत असल्याचे चित्र असून यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते दड्डी हत्तर्गी रस्त्याला जोडणारा मार्ग कालकुंद्री ते कुदनुर, तळगुळी, राजगोळी मार्गावर ओढ्यांचे तर कागणी कालकुंद्री मार्गावर ताम्रपरणी नदीचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान ताम्रपर्णी नदी चे पाणी कोवाड बाजारपेठेत घुसल्यामुळे दुकानदारांनी सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
         तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोनारवाडी येथील ईश्वर धोंडिबा नाईक यांच्या घराची भिंत कोसळून ३० हजार, खालसा गुडवळे येथील शिवाजी भिकू गावडे यांच्या घरावर झाड पडून ५० हजार, कोवाड येथील राजाराम मारुती भोगण घराची भिंत पडून १ लाख, मोटणवाडी येथील गंगाराम केदारी दळवी यांच्या घराच्या खापऱ्या उडून २ हजार, पार्ले येथील जोतिबा मारुती दळवी यांच्या गँरेज वर झाड पडून २ हजार, सोनारवाडी येथील महादेव रामू  गावडे  यांच्या घराची  भिंत पडून २५ हजार, आमरोळी येथील रावसो बाळू मंडलिक यांच्या गोठ्याची भिंत पडून १ लाख रुपये असे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment