वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३० सर्पदंशावरील प्रथमोपचार - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३० सर्पदंशावरील प्रथमोपचार

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ३० :-  सर्पदंशावरील प्रथमोपचार
१) सर्पदंश झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तांत्रिक-मांत्रिक किंवा गावठी उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ नये.
२) जिथे सापाने दंश केला असेल त्याच्या वरील बाजूस (हृदयाकडील दिशेस) आवळपट्टी घट्ट बांधा. प्रत्येक वीस मिनिटानंतर पट्टी किमान पंधरा-वीस सेकंद थोडीशी सैल करून पुन्हा घट्ट बांधावी.
 ३) शक्य असल्यास तोंडात व ओठावर जखम नसलेल्या व्यक्तीने दंशाच्या ठिकाणी तोंडाने रक्त शोषून घेऊन थुंकुन टाकावे.(पण यातही जोखीम आहे.) शक्य झाल्यास त्याने पोटॅशियम परमॅग्नेट मिश्रित पाण्याने चूळ भरावी.
 ४) सर्प दंश विषारी असो वा नसो दंश झालेल्या व्यक्तीस धीर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा धीर खचेल असे वक्तव्य त्याच्यासमोर टाळावे.
 ५) शक्यतो सर्पदंशाची जखम पोटॅशियम परमॅग्नेट मिश्रित किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन काढावी.
 ६) सर्पदंश झालेल्या व्यक्तीने धावपळ करू नये. असे केल्यास त्याची रक्ताभिसरण प्रक्रीया जलद होऊन विष संपूर्ण शरीरात लवकर भिनले जाते.
७) सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चालायला किंवा धावायला लावण्या ऐवजी त्याला वाहनातून किंवा उचलून डॉक्टर किंवा रुग्णालयापर्यंत नेणे गरजेचे आहे. कमीत कमी हालचाल होईल असे पाहावे.
८) ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे; त्या ठिकाणी कोणत्याही शस्त्राने जखम करू नये, बर्फ लावू नये किंवा चोळू नये.
९) सर्पदंशावरील औषध / इंजेक्शन हे शासकीय रुग्णालय/ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळते. शक्य तितक्या लवकर बाधित रुग्णाला (तिथे औषध उपलब्ध आहे याची खात्री करून) अशा ठिकाणी घेऊन जावे.
१०) डॉक्टरकडे गेल्यानंतर रुग्णास दमा किंवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर तसे सांगावे.
११) सर्पदंश झालेल्या व्यक्ती जवळ स्त्रियांनी जाऊ नये असा एक समज प्रचलित आहे पण हे चुकीचे असून कोणत्याही स्त्रीने सर्पदंश झालेल्या रुग्णास मदत करण्यास हरकत नाही. 
( तथापि सर्पदंश झालेल्या रुग्णाजवळ त्याला धिर देणारे वक्तव्य गरजेचे असताना महिला मंडळ त्याचा धीर खचेल असे हमखास आपापसात बोलतात. त्याचा विपरीत परिणाम रुग्णावर होतो. अनेक वेळा बिनविषारी साप चावल्यानंतर सुद्धा अशा प्रकारांमुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठीच बहुदा हा समज पूर्वापार पसरवण्यात आला असावा.)



माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment