अखेर कृषी अधिकाऱ्यांकडून तुर्केवाडी येथील पिक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2020

अखेर कृषी अधिकाऱ्यांकडून तुर्केवाडी येथील पिक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शिवारात पिकांच्या नुकसानिची पाहणी करुन पंचनामे केले.
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
        तुर्केवाडी पंचक्रोशीत अतिवृष्टीमुळे नदीकाठ तसेच सखल भागातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये भात, ऊस पिकांमध्ये पाणी घुसल्याने पिकं कुजून गेली आहेत. वादळी वाऱ्यासह पावसाने सखल भागातील पिके जमिनदोस्त झाली तर नदिकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करुन पंचनामे त्वरीत करण्याची मागणी होत होती. त्यासाठी तुर्केवाडीतील शेतकऱ्यांनी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीही केली होती.
           दरम्यान, आज तुर्केवाडी येथील नदिकाठच्या, तुर्केवाडी फाटा व वैताकवाडी येथील शेतात जात कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करुन नुकसानिचे पंचनामे केले. यावेळी कृषी सहाय्यक श्री. साबळे, तुर्केवाडीच्या तलाठी अश्वीनी पवार, गावकामगार पोलिस पाटील माधुरी कांबळे व शेतकरी उपस्थित होते.
           यंदा कोरोनाचा फटका त्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. त्यात जोरदार वादळी पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार नुकसानिची पाहणी करुन पंचनामे करावेत अशी मागणी कृषी विभागाकडे केली होती. त्यानंतर तहसिलदारांकडे पाठपूरावाही केला. अखेर आज कृषी अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष शिवारात जात पिकांच्या नुकसानिची पाहणी करुन पंचनामे केले. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment