तुर्केवाडी सायफन पाणी योजना त्वरित दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2020

तुर्केवाडी सायफन पाणी योजना त्वरित दुरूस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

 
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे पाणी योजनेची दुरुस्ती करताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.

तुर्केवाडी / प्रतिनिधी
         तुर्केवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी सायफन पाणी पुरवठा योजना गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये खराब झाली असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती दुरुस्त केली जाणार होती. मात्र, अद्याप या योजनेची देखभाल दुरुस्ती न झाल्याने यंदाही तुर्केवाडी, वैताकवाडी व यशवंतनगर गावांवर पाणी टंचाई व खंडीत पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने या गावांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता त्वरित ही नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करुन दिलासा द्यावा अशी मागणी तुर्केवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
            याबाबत सरपंच श्री. रुद्राप्पा तेली म्हणाले की, तुर्केवाडी गावासाठी पूर्वीपासूनच डोंगरातून सायफन पद्धतीची नळ पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे.दरम्यान, मागिल अतिवृष्टीमध्ये या सायफन योजनेला फटका बसला असून अनेक ठिकाणी गळती व पाईप खराब होण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामपंचायत १३ व १४ व्या वित्त आयोगातून खर्च करुन तात्पुरती व अर्धी दुरुस्ती केली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पाईपलाईनचे परिक्षण करुन देखभाल दुरुस्तीसाठी तरतुद करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याबाबत कारवाई झालेली नाही. तरी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालून ही नळ पाणी योजना लवकरात लवकर दुरुस्त व्हावी यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरुन या तीनही मोठ्या गावचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. सध्या तुर्केवाडी, वैताकवाडी येथे दोन जॅकवेल असून यशवंतनगर येथे बोरच्या पाण्याचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर वीज बिलावर ग्रामपंचायत निधी खर्च होत आहे. तरी ही सायफन योजना दुरुस्त झाल्यास हा खर्चाचा भार कमी होईल व इतर विकास कामांना गती देता येईल.
          याबाबत उपसरपंच श्री. अरुण पवार म्हणाले की, तुर्केवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे भौतिक क्षेत्र व लोकसंख्या अधिक असून या तीनही गावांना पाणीपुरवठा करतांना मोठी कसरत ग्रामपंचायतीला करावी लागत आहे. सध्या आपली पाणी पुरवठा व साठवण क्षमता चांगली असूनही केवळ या सायफन योजनेत गळती असल्याने म्हणावा तितका पाणीसाठा करता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने जॅकवेल व बोरवर अवलंबून रहावे लागत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून ही उर्वरीत पाईपलाईन दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी.



No comments:

Post a Comment