अखेर तिने डोळे मिटले, कोठे घडली ही घटना? - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2020

अखेर तिने डोळे मिटले, कोठे घडली ही घटना?


वृध्द मादी गवा.
चंदगड / प्रतिनिधी 

        पाटणे (ता. चंदगड येथील  वनपरिक्षेत्र कार्यालय  पासून जवळच पाटणे धरणा लगत असलेल्या  अशोक देसाई यांच्या ऊसाच्या  शेतामध्ये एका मादी वृध्द गव्या आला होता. वृध्दापकाळाने त्याला चालता येत नव्हते. हि माहीती वनविभागाला समजल्यानंतर त्यांनी त्यावर उपचार केले. मात्र ते ही कामी न आल्याने या वृध्द मादी गव्याचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला. 

           पहिल्या दिवशी ऊस तोड करणारे मजूर गव्यांचा कळप पाहून  परत गेले होते, पुन्हा ऊस तोड मजूरांना गवा दिसल्यांने ते पाटणे परिक्षेत्र कार्यालय मध्ये आले व गव्यांचा माहिती दिली. प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी पथकासह पाहणीसाठी फटाके सुरबान घेऊन निघाले. उसा नजीक जाऊन बघितले असता सरीमध्ये गवा उभा होता. माणसं बघून तो ठिसकला म्हणून दोन बॉम्ब वाजवले गेले. त्यामुळे त्याने दिशा बदलली थोडे चालून खाली बैठक मारली. त्यावेळी वन अधिकाऱ्यांना त्याच्या प्रकृतीची शंका आली. थोड्यावेळाने चंद्रकांत बांदेकर वनमजूर धाडसाने पुढे गेले. तेव्हा "तो" नसून "ती" असल्याची खात्री झाली. तिचा प्रतिकार कमी झाला होता, धापा टाकत होती. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी शेजारील शेतांमधून पाणी आण्यास सांगितले व प्लास्टिकची घागर कापून तिला पाणी पाजले. गवा मादीला पाणी पिल्यामुळे तरतरी आली. ती उठण्याचा प्रयत्न करत होती. पण उठता येत नव्हते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तिला वेदनाशक ऑंटी बायोटीक व कॅल्शियमचे इंजेक्शन दिले. तरी सुध्दा तीला उठता आले नाही. तिची जगण्याची धडपड सायंकाळी सहा वाजता थांबली ती कायमची.

        ऊस खाण्यासाठी गव्यांचा  कळप आला होता. पण वयोवृद्ध झाल्यामुळे गवा मादीला  तिथून जाता आले नाही. वृद्ध पणाची एकांताची व्यथा वन्यप्राण्यांना ही चुकली नाही. उसातून मृत मादी गवा बाहेर दोरखंड लावून काढताना वन कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले. सदर मादी सुमारे सतरा अठरा वर्षाची असल्याने वृध्दापकाळाने तिचे निधन झाल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले. वन विभागाने वैद्यकीय तपासणी नंतर मादीला दफन केले.

         याकामी वनरक्षक गणेश बोगरे, सागर पाटील, मेघराज खुल्ले, वनमजूर चंद्रकांत बांदेकर, मोहन तुपारे, तुकाराम गुरव, अर्जुन पाटील, विश्वनाथ नार्वेकर, किरण आवडण यांच्यासोबत ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.



No comments:

Post a Comment