हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2020

हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 


चंदगड/प्रतिनिधी:-(नंदकुमार ढेरे) चंदगड तालुक्यात ऐन सुगीत हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसभर डोंगरात आराम करणे आणि रात्री शिवारातील पिकांचा मनसोक्त आनंद घेणे ,असा  हत्तींचा दिनक्रम सूरूआहे.

                हेरे,पार्ले,मोटणवाडी, वाघोत्रे, इसापूर, कानूर, सडेगूडवळे, पूंद्रा,बिजूर,आदी गावातील  शिवारातून हत्तींचा रात्रीस खेळ चालल्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत . वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा , अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे . गेले चार दिवस हत्तींचा हेरे परिसरात वावर असून बुधवारी रात्री खालसा सावर्डे गावात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे . हत्तींकडून परिसरातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मळणीला रचून ठेवलेले भात व मळणी काढून भरून ठेवलेले भात पोती उद्ध्वस्त केली आहेत . खालसा सावर्डे व खालसा कोळींद्रे या दोन गावात सध्या हत्तींचा वावर असून भात पीक जमीनदोस्त करीत आहेत . येथील लक्ष्मण पाटील , गोविंद नागोजी पाटील , विष्णू जानकू पाटील , पांडुरंग धनाजी पाटील , गंगाराम धनाजी पाटील , शामराव पाटील , पुंडलिक आप्पाजी पाटील , बंडोपंत आप्पाजी पाटील , वैजू पाटील , चंद्रकांत जेलुगडेकर , पांडुरंग पाटील , रामभाऊ पाटील , रामू पाटील , भागीरथी पाटील यांच्या पिकांचे नुकसान केले . साखर कारखान्यानी हत्ती बाधीत क्षेत्रातील  ऊस उचल  लवकर करून  सहकार्य करावे ,असे आवाहन खालसा कोळींद्रेचे सरपंच संजय गावडे यांनी केले आहे .




No comments:

Post a Comment