संधीच सोनं करण्याची ताकद स्पर्धा परीक्षांतून - डॉ. एस. डी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2020

संधीच सोनं करण्याची ताकद स्पर्धा परीक्षांतून - डॉ. एस. डी. पाटील

स्पर्धा परिक्षा ग्रंथालयाचे उदघाटन करताना प्रा. एस. डी. पाटील, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर व इतर. 

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा 

        स्पर्धा परीक्षांतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असून संधीच  सोनं करण्याची ताकद स्पर्धा परीक्षातून येते असे प्रतिपादन शिवराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस डी पाटील यांनी केले. ते नेसरी येथे अड. संदीप फगरे यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी  शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

         प्रारंभी नांदवडेकर यांच्या हस्ते फीत कापून  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात ग्रंथालयाचे संकल्पक संदीप फगरे यांनी ग्रंथालयाच्या हेतू व उद्देश स्पष्ट करून  जीवनात काहीतरी जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दालन नेहमी खुले असून सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

           डॉ पाटील पुढे म्हणाले,  नेसरी गावाला ऐतिहासिक, शैक्षणिक  व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी  सुरुवातीपासूनच अभ्यासाचे वळण लावून  घ्यावे. तसेच अधिकारी झाल्यावर प्रथम जनकल्याणाचा विचार करावा असेही आवाहन पाटील यांनी केले.  डॉ. नांदवडेकर म्हणाले, नेसरी सारख्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे केंद्र झाल्याने विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने काही विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. पण आता ही उणीव दूर झाली असून पायाभूत सुविधा उपलद्ध झाल्याने निश्चितच नेसरीच्या वैभवात भर पडली आहे.  याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. लवकरच या ग्रंथालयाचे वटवृक्षात रूपांतर होईल. हे डिजिटल युग असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा हे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी नेहमी आपले सहकार्य  मिळेल अशी ग्वाही नांदवडेकर  यांनी शेवटी दिली.

यावेळी जयसिंग पाटील,  कृष्णराव वाईंगडे यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी डॉ नांदवडेकर यांचा नारायण फगरे गुरुजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रकाश कोरी यांनी केले. आभार रविंद्र हिडदुगी यांनी मानले. कार्यक्रमास सरपंच आशिषकुमार साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी,  शिवाजीराव हिडदुगी, शिवाजीराव पाटिल, एम ए नेरलीकर,  दयानंद नाईक, रामचंद्र परीट, आनंद कोरी, आनंदा नेरलिकर, भैरू मूसाई, सुरेश निकम, जोतिबा भिकले, शिवाजी पाटील, राजू हल्याळी, गुलाबराव पाटील, अरुण फगरे, आप्पासाहेब कुंभार, यशवंत कोळी, शशीकांत हुक्केरी, रवी नाईक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment