तुडये परिसरात बिबट्यानंतर अस्वलाचे दर्शन, खबरदारी घेण्याचे वनखात्यातर्फे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2020

तुडये परिसरात बिबट्यानंतर अस्वलाचे दर्शन, खबरदारी घेण्याचे वनखात्यातर्फे आवाहन

तुडये : अस्वलाने मुंग्या तसेच किडे खाण्यासाठी जंगलात कोरलेला खड्डा.
कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

      तुडये परिसराला लागून असलेल्या जंगलात काही दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक 25 रोजी अस्वलाचेही दर्शन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे. मुंग्या तसेच किडे खाण्यासाठी अस्वलाने दीड बाय दोन फूट आकाराचे खड्डे कोरल्याचे वनपथकाला आढळून आले आहे. तसेच अस्वलाची विष्ठा ही आढळून आल्याने अस्वलांचा वावर स्पष्ट झाला आहे. 

      बुधवार दि. 25 रोजी तुडये येथील शेतकरी रामलिंग पाटील, रामु येडगे, विठठल येडगे, संतोष येडगे, सुनिल येडगे यांना जंगलात अस्वलाचे दर्शन झाले. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एन. एम. धामणकर, वनरक्षक एम. आय. सनदी, सदाशिव तांबेकर, पुजा चव्हाण, वनसेवक मोनापा  मुतकेकर, नारायण गावडे यांनी घटनास्थळी जावून  पाहणी केली. तुडये  धनगरवाडा, आडवा हळळा, तुडये काजुबाग, तुडये परिसर फिरून पाहिले असता अस्वलाच्या नखाच्या खुणा ठिकठिकाणी दिसून आल्या. काही ठिकाणी अस्वलाची विष्ठा दिसुन आली. त्यामुळे लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोणीही जंगलात शेळ्या, मेंढया किंवा जनावरे घेवून अथवा काही कामानिमित्त जावू नये, अशा खबरदारीच्या सुचना वनविभागाने दिल्या आहेत. या परिसरात पहिल्यांदाच अस्वलाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यात भीती आहे. तुडये परिसरातील धनगरवाडा म्हाळुंगे, कोलीक व बेळगाव तालुक्यातील धामणे या गावातील शेतकऱ्यांनीही सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment