कोवाड बंधारा बचावासाठी स्वाभिमानीचे प्रतीकात्मक आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

कोवाड बंधारा बचावासाठी स्वाभिमानीचे प्रतीकात्मक आंदोलन

कोवाड बंधाऱ्यावर  बांधकामाचे प्रतीकात्मक पूजन करताना दीपक पाटील व स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व मोडकळीस आलेला बंधारा.

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

       कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीवर ६५ वर्षांपूर्वी बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ढासळत चालला आहे. वाहतुकीसाठी नवीन पूल झाल्यामुळेही हा बंधारा गेल्या चार-पाच वर्षात दुर्लक्षित झाला आहे. अनेक वेळा मागणी करूनही या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बंधारा दुरुस्ती शुभारंभाचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. 
      स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा दीपक पाटील व कागणी गावचे माजी उपसरपंच जनार्दन देसाई  यांनी कोसळलेल्या पिलरवर पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते अर्जुन वांद्रे, गजानन पाटील, गजानन राजगोळकर, अल्पिन लोबो, संजय कुट्रे, विक्रम पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटबंधारे विभागाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बंधाऱ्याच्या अनेक पिलर चे दगड निखळून बंधारा ढासळण्याच्या मार्गावर असतानाही बरगे टाकून ताम्रपर्णी नदीचे पाणी अडवण्याची घिसाडघाई सुरू आहे. तथापि यातील बहुतांशी पाणी गळतीमुळे खाली जात आहे. कर्यात भागातील बऱ्याच गावांना शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी ताम्रपर्णी नदीवर अवलंबून रहावे लागते अशा परिस्थितीत दररोज लाखो लिटर पाणी हे वाहून जात असून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच भेडसावणारा आहे. तरी बसवलेले बर्गे  काढून २१ डिसेंबरच्या आत बंधाऱ्यांची दुरुस्ती न केल्यास जल आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दीपक पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment