राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, वर्षभराचा 100 टक्के जीएसटी परतावा मिळणार - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, वर्षभराचा 100 टक्के जीएसटी परतावा मिळणार

मुंबई / प्रतिनिधी 

         महाविकास आघाडी शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२० पासून राज्य शासनाच्या हिस्स्याचा १०० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यासंबंधीचे शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. राज्यातील काजू उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जीएसटी परतावा मिळण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांची बैठक घेऊन जीएसटी परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी (दि .२) रोजी जारी करण्यात आला. राज्यामध्ये उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या काजुपैकी राज्यात विक्री झालेल्या काजुच्या विक्रीवर देय असलेल्या वस्तू व सेवा करापैकी राज्याच्या हिस्स्याचा १०० टक्के ढोबळ जीएसटी प्रोत्साहन अनुदान म्हणून काजू प्रक्रिया उद्योगास दिले जाणार आहे. १ जानेवारी २०२० पासून ही सवलत लागु राहणार आहे .काजू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन अनुदानासाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून त्या खालील प्रमाणे 

१)  काजू प्रक्रिया घटकाने संबंधित कालावधीसाठी त्यांनी केलेल्या काजूच्या विक्रीवर Input Tax वजा जाता उर्वरित राज्य वस्तू व सेवा कराचा भरणा करणे आवश्यक आहे .
२) काजू प्रक्रिया उद्योग घटकाने काजूच्या विक्रीवर देय राज्य वस्तू व सेवा कराबाबत संबंधित राज्यकर सह आयुक्त ( एसजीएसटी प्रशासन ) यांनी भरलेल्या कराचे पुरावे तपासून तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे .
३)  अनुदान पात्र काजू प्रक्रिया उद्योग घटकाने प्रोत्साहन अनुदानाचे तिमाही / अथवा यथास्थिती करदेयतेप्रमाणे सहामाही दावे उद्योग संचालनालय / संबंधित जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडे सादर करावेत . 
४) शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संगणक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२०१२०२१०५६५५८९१० असा आहे.



No comments:

Post a Comment