कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील सर्पोद्यान ची मान्यता महाराष्ट्र राज्य प्राणीसंग्रहालय प्राधिकरण नागपूर यांचेकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्प व पर्यावरण प्रेमींत एकच खळबळ उडाली आहे.
ढोलगरवाडी येथील शेतकरी शिक्षण मंडळ संचलित सर्पालय तथा सर्पोद्यान आद्य सर्पमित्र कै.बाबुराव टक्केकर यांनी १९६६ साली सुरू केले. याच्या माध्यमातून गेली साठ वर्षे पर्यावरण साखळीतील सर्वात महत्त्वाचा घटक व शेतकऱ्यांचा मित्र सापांविषयी अंधश्रद्धा दूर करून समाज प्रबोधन सुरू आहे.
टक्केकर यांना सुरुवातीस याबाबत गाव व परिसरातून प्रखर विरोध झाला तथापि त्यांनी आपला वसा टाकला नाही. शेवटी शासनानेच याची गरज ओळखली व केंद्रीय प्राणी संग्रहालय मंत्रालयाने मान्यता दिली. ती अनेक वर्षे सुरू होती. तथापि वन्य प्राणीसंग्रहालयाच्या अटी हे सर्पोद्यान पूर्ण करत नसल्याच्या कारणास्तव २८ नोव्हेंबर २०१८ रोजी 'झू ' ने मान्यता रद्द केल्याचे पत्र दिले. त्यानंतर शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांचे अथक प्रयत्न व त्यांना खासदार सुप्रिया सुळे, जिल्ह्याचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, संभाजी राजे छत्रपती, सर्व आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, बेळगावचे खासदार कै. सुरेश अंगडी, प्रभाकर कोरे, चंदगड तालुका पत्रकार संघ यांचेसह विविध खात्यांचे अधिकारी यांच्या सहकार्याने मुदतवाढ मिळाली होती. तथापि दरम्यानच्या दोन वर्षात शेतकरी शिक्षण मंडळातील अंतर्गत लाथाळ्या व कुरघोडीमुळे ? मुदतवाढ देऊनही सर्पोद्यान बाबतच्या त्रुटी जैसे थे राहिल्याचे समजते. शेवटी २० नोव्हेंबर २०२० रोजी मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण नागपूर यांच्या कार्यालयाने केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण / केंद्रीय पर्यावरण मंत्रालय (CZA) नवी दिल्ली यांच्या आदेशास अनुसरून ढोलगरवाडी प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केल्याचे पत्र दिले आहे. तसेच दर्शवलेल्या त्रुट्यांच्या अनुषंगाने आपण केलेल्या कार्यवाही बाबत सविस्तर व मुद्देसूद अहवाल केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण नवी दिल्ली यांना तात्काळ सादर करून अवगत करण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास मान्यता कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.
सर्पमित्र कै टक्केकर सर यांनी आपली हयात खर्ची घालून जपलेल्या व वाढवलेल्या या प्रबोधन व संशोधन केंद्रामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू या राज्यातील वनविभाग, डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालये, पोलीस, आर्मी, विद्यार्थी यांना अभ्यासाची सोय झाली होती.
वरील स्थिती अशीच राहिल्यास ढोलगरवाडी गावासह तालुका, जिल्हा व महाराष्ट्राला अभिमानास्पद असलेला हा ठेवा इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही. हे टाळण्यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवावेत, याकामी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा त्यांना तालुका व जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी साथ द्यावी अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment