कुदनुर ग्रामपंचायत जाहीर निविदा ग्रामस्थांच्या उपस्थितीत उघडणार - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

कुदनुर ग्रामपंचायत जाहीर निविदा ग्रामस्थांच्या उपस्थितीत उघडणार

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

          ग्रामपंचायत कुदनुर (ता.  चंदगड) मार्फत विविध विकास कामांच्या निविदा (टेंडर) जाहीर केल्या होत्या. इच्छुक ठेकेदाराकडून आलेल्या निविदा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या उघडल्या जाणार आहेत.

        पाकीटबंद आलेल्या निविदा संबंधित अधिकारी, सरपंच व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बंद खोलीत उघडून त्यावर निर्णय घ्यायची पद्धत प्रचलित आहे. तथापि गावच्या सरपंच सौ शालन कांबळे, उपसरपंच नामदेव कोकितकर व कमिटीने ग्रामपंचायतचा कारभार अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने हे वेगळे पाऊल उचलले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो अन्य ग्रामपंचायतींसाठी ही दिशादर्शक ठरू शकतो. ग्रामपंचायतच्या वतीने गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, जिल्हा परिषद शाळा शौचालय, रंगकाम, दुरुस्ती, तारेचे कंपाउंड, शैक्षणिक साहित्य खरेदी, अंगणवाडी रंगकाम, ग्रामपंचायत साठी फर्निचर खरेदी करणे आदी कामांसाठी सुमारे तीस लाख रुपये किमतीच्या जाहीर निविदा वर्तमानपत्रातून ७ जानेवारी रोजी प्रसिद्ध केल्या होत्या त्या शुक्रवार दि. १६ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या उघडण्यात येणार असल्याने परिसरातील ग्रामस्थ, ग्रामपंचायती व ठेकेदार वर्तुळात हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.No comments:

Post a Comment