ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता अबाधित राहणार का? सर्प प्रेमींत उत्सुकता - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

ढोलगरवाडी सर्पोद्यानची मान्यता अबाधित राहणार का? सर्प प्रेमींत उत्सुकता

ढोलगरवाडी सर्पोद्यानसाठी जमिनीच्या उपलब्धते विषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना तानाजी वाघमारे, सोबत तुकाराम मुंगुर्डेकर व संगम कक्केरी.

विशाल पाटील / कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पोद्यानची झू अथॉरिटी ऑफ इंडिया ने रद्द केलेली मान्यता पुन्हा मिळेल का? याबाबत सर्प प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यासाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पालय कार्याध्यक्ष तानाजी वाघमारे यांच्या प्रयत्नांना ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.

        गेल्या ६० वर्षांपासून ढोलगरवाडी येथे आद्य सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या सर्पोद्यानच्या माध्यमातून साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. त्याच्याविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे हा विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य केले आहे. याबरोबरच ते महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील वनविभाग, पोलीस खाते, भारतीय सैन्य दल, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, शेतकरी व नागरिकांसाठी माहिती, अभ्यास व संशोधन केंद्र बनले आहे. येथील शेतकरी शिक्षण मंडळ याचे रूपांतर पर्यटन केंद्रात करू पाहत आहे. तसे झाले तर ते चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र शासनाला भूषणावह ठरेल. तथापि याची मान्यता कायमची रद्द झाल्यास वरील सर्व अभ्यासकांसह पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे.

          या सर्पोद्यान ची स्थापना टक्केकर यांनी १९६६ ला केली मात्र १९७२ साली अस्तित्वात आलेल्या वन्य जीव संरक्षण  कायद्याचा आधार घेत हे सर्पोद्यान नियमांची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशास अनुसरून महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय चिडियाघर प्राधिकरण (सेंट्रल झू) CZA यांनी २० नोव्हेंबर २०२० रोजी यापूर्वी दिलेली मुदतवाढ रद्द करत दुसऱ्यांदा मान्यता रद्द चे पत्र दिले.  त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी सर्पोद्यान साठी लागणाऱ्या जमिनीची शासनस्तरावरून पूर्तता व्हावी यासाठी धडपड सुरू केली आहे. याला ग्रामविकास मंत्री ना मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील संबंधित आमदार, खासदार, मंत्री व अधिकारी यांनीही सहकार्य दाखवले असले तरी मान्यता रद्द चे संकट टाळून सर्पालयातील सर्प संपत्तीला नैसर्गिक अधिवास प्राप्त करून देण्यासाठी तात्काळ किमान पंधरा हेक्‍टर जमिनीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. शासनस्तरावर याला बळकटी मिळाल्यास हे ठिकाण अभ्यास व संशोधन केंद्रासह आगळेवेगळे पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्धी पावेल. अन्यथा आपले सर्वस्व पणास लावून टक्केकर कुटुंबीयांनी पाच दशके जतन केलेले सर्पोद्यान इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.



No comments:

Post a Comment