चंदगड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडूनच शेतकऱ्यांची लूट, कारखान्यांचे दुर्लक्ष, कोण करत आहे ही लुट? वाचा सविस्तर........... - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2021

चंदगड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडूनच शेतकऱ्यांची लूट, कारखान्यांचे दुर्लक्ष, कोण करत आहे ही लुट? वाचा सविस्तर...........

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        चंदगड तालूक्यात वाढलेल्या उसक्षेत्राचा लाभ कारखान्याबरोबर ऊसतोड करणाऱ्या मजूरांना झाला आहे. खुशालीच्या नावाखाली चंदगड तालूक्यातील शेतकरीच असलेल्या ऊसतोड कामगार (टोळी) कडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट चालू आहे. हेच टोळीवाले ऊस उत्पादक शेतकऱ्याबरोबरच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकालाही पध्दतशिरपणे लूटत असल्याचे चित्र चंदगड तालूक्यात पहावयास मिळत आहे. हे असेच चालू राहिल्यास टोळीवाले मालामाल तर ऊस उत्पादक शेतकरी व वाहन मालक मात्र निश्चित कंगाल होण्यास वेळ लागणार नाही.

             या अगोदर चंदगड तालूक्यात कर्नाटकाबरोबरच बीड, उस्मानाबाद आदि परगावाहून आलेली फडकरी उन्हातान्हात ऊस तोडून उपजीविका करत होते. त्यांना साखर कारखाना योग्य ते मानधन देतो. तरीही शेतकरी राजाला त्या फडकऱ्यांच्या बद्दल दया निर्माण होऊन, त्या फडकऱ्यांना खूश होऊन शेतकरी शंभर -दोनशे रुपये चहा पाण्याला  देऊ लागला. ते पाहून ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला पण, शेतकऱ्यांनी आपणास पण खुशाली द्यावी. अशी इच्छा बाळगून तो ही, "आम्हाला पण खुशाली दया "म्हणू लागला. शेतकरी राजा माणूस. तो ड्रायव्हर ला पण खुशाली देऊ लागला. खुशाली ही कामावर खूष होऊन दिली जाते व ती ऐश्चिक असते. पण फडकरी व वाहन चालक तो हक्क समजू लागले. त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू लागले. शंभर दोनशे वर असणारी खुशाली पाचशे ,हजार करीत, पाच दहा हजारावर कधी पोहचली हे चंदगडच्या शेतकऱ्यांना कळलंच नाही.            चंदगड तालूक्यात गावोगावी ऊस तोड टोळ्या निर्माण झाल्या. या टोळीकडून टनाला १०० पासून ३०० रुपये शेतकऱ्याकडून उकळले जात आहेत. वाहतूक असेल तर वेगळे बिल. याबरोबरच स्पेशल बिस्कीटे, चहा आणि ऊस जास्त असेल तर चमचमित रंगीत -संगीत पार्टी द्यावी लागत आहेत. एवढे देऊनही ऊस कधी तोडला जाईल याची खात्री नाही. वाहनधारकाला तर ही टोळी सांभाळताना भिक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे. याच टोळींना सतत पार्टी देणे, फिरायला घेऊन जाणे, कपडे शिवणे इतकेच काय तर मोठी बकरी कापून जिभेचे चोचले याच वाहनधारकाला पूरवायला लागत आहेत. ही प्रचंड मोठी मुस्कटदाबी शेतकरी सहन करू लागला आहे. पण किती दिवस सहन करायचे? याला खतपाणी कोण घालतंय? शेतकऱ्यांने कारखान्याबरोबर ऊस देण्याचा करार केला आहे. त्या करारप्रमाणे तयार झालेला ऊस वेळेत उचल करण्याची जबाबदारी कारखान्याची आहे. हेच नेमकं शेतकरी विसरला आहे आणि कारण नसताना भरडला जात आहे.

               ऊसतोड मजुरांना चालू वर्षी १४ टक्के घसघासित मजुरी वाढ मिळाली आहे. याउलट शेतकऱ्यांच्या शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. खताच्या किंमतीत ४० टक्के वाढ झाली आहे. असं असून सुद्धा शेतकऱ्यांचेच नुकसान केले जात आहे, हे कोठेतरी थांबले पाहिजेत. शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवे. नाहितर येथील शेतकरी पुन्हा भात शेतीकडे वळायला वेळ लागणार नाही.




No comments:

Post a Comment