कुदनुर- हांदिगनूर मार्गाकडे दोन्ही राज्यांचे दुर्लक्ष, सत्तर वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2021

कुदनुर- हांदिगनूर मार्गाकडे दोन्ही राज्यांचे दुर्लक्ष, सत्तर वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेला कुदनूर- हांदिगनूर राज्यमार्ग.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७३ वर्षानंतरही महाराष्ट्र- कर्नाटक  राज्यांना जोडणाऱ्या कुदनुर हांदिगनूर राज्य मार्गाची दुर्दशा जैसे थे आहे. ही दुरावस्था संपणार तरी कधी? असा संतप्त सवाल प्रवासी, वाहनधारक व परिसरातील नागरिक करत आहेत.

      चाळीस वर्षांपूर्वी इतर रस्ते अस्तित्वात नसताना कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, राजगोळी परिसराला बेळगावशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख होती.  इकडील गुऱ्हाळघरातून तयार होणा-या गुळाची वाहतूक बैलगाडीने याच मार्गाने व्हायची.  पन्नास वर्षापूर्वी पासून ये-जा करणारी बेळगाव आगाराची कालकुंद्री बस रस्त्याच्या कारणाने  पंधरा वर्षांपासून बंद आहे.  इतर कोणत्याही मार्गाने होणारे बेळगावचे २५ किलोमीटर होणारे अंतर इकडून २०-२२ किमी होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कुदनूर  परिसरातील २०- २५ गावांच्या बेळगाव सीमा भागाशी असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक देवाण-घेवाणी वर मर्यादा येत आहेत. तर प्रवाशांनाही आर्थिक भुर्दंड बसत आहे. कुदनुर पासून हांदिगनूर पर्यंत या दूरवस्थेतील मार्गाची लांबी सात किमी असून यापैकी पाच किमी महाराष्ट्र (चंदगड विधानसभा मतदारसंघ) तर दोन किमी अंतर कर्नाटक (यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघ) राज्यात येते. दोन्ही राज्यातील संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष व उदासीन वृत्ती; तसेच परिसरातून अपेक्षित जनरेट्याचा अभाव यामुळेच या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही संपत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

      परिसरातील कुदनुर, कालकुंद्री, किटवाड, खन्नेटी, हांदिगनूर आदी ग्रामस्थ मात्र रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाकडे आशाळभूतपणे नजर लावून आहेत. 

No comments:

Post a Comment