चिमण्यांना वाचवण्यासाठी सरसावले विद्यार्थ्याचे हात, शाळेच्या आवारात धान्य व पाण्याची सोय - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2021

चिमण्यांना वाचवण्यासाठी सरसावले विद्यार्थ्याचे हात, शाळेच्या आवारात धान्य व पाण्याची सोय

चिमण्यांना वाचविण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न

तेऊरवाडी ( एस. के. पाटील )

        दि न्यू  इंग्लिश स्कूल चंदगड मधील विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात चिमण्यांसाठी धान्य व पाणी पिण्याची सोय केली. 

चिमण्यांना वाचविण्यासाठी विद्यार्थ्योनी झाडावर लटकवलेले पाणी व धान्य

      वाढते प्रदुषण, जंगलतोड, मोबाईलचे टॉवर ,पिंकावर जंतूनाशक फवारणी , पर्यावरणाचा ऱ्हास याकारणामुळे अनेक पक्षी, प्राणी नामशेष होत आहेत. चिमणीशी आपले नाते तर जन्मापासूनचे असते. हा पक्षी जगवायची जबाबदारी आपली आहे अशा आशयाचा संस्कार शाळेतून विद्यार्थांच्या मनावर कोरला गेला. तोही प्रत्यक्ष कृतीशील सहभागातून. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान झळकत होते.

      घरातील टाकाऊ वस्तुंचा वापर करून चिमण्यांसाठी धान्य व पाणी ठेवण्याच्या वस्तुत रूपांतर करण्यात आले. प्लास्टीकची बरणी डब्बा, नारळाची करवंटी, मातीची मडकी , फुटलेली घागर ,पुटटयाचे खोके  यांना योग्य आकार देऊन त्याचा धान्य व पाणी ठेवण्यासाठी उपयोग करण्यात आला. या वस्तू शाळेच्या परिसरात  झाडांवर ठिकठिकाणी तसेच शाळेच्या व्हरांड्यात अडकविल्या आहेत.

     विद्यार्थ्यानी तयार केलेल्या या वस्तुतील धान्य तसेच पाण्याचा चिमण्यांकडूनही वापर केला जात आहे. हे दृश्य समाधान देणारे आहे. हा उपक्रम प्राचार्य आर.आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साबळे यांनी यशस्वीपणे राबविला आहे. श्री साबळे दरवर्षी २० मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून शाळेत साजरा करतात. कु .वृषाली झेंडे . शाहीर कांबळे, बाळकृष्ण शिंगाडे, सूरज सूर्यवंशी, शिवानी पाटोळे, तन्मयी गावडे, सानिका पाटील आदि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमासाठी उपप्राचार्य ए.जी. बोकडे, पर्यवेक्षक एस .जी. सातवणेकर, टी. एस. चांदेकर, शरद हदगल,सूरज तुपारे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment