कोवाड प्रा. आ. केंद्रात कोविड १९ लसीकरणास वाढता प्रतिसाद, २४५० नागरिकांनी घेतली लस - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2021

कोवाड प्रा. आ. केंद्रात कोविड १९ लसीकरणास वाढता प्रतिसाद, २४५० नागरिकांनी घेतली लस

लस घेतल्यानंतर प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या नागरिकांचे समुपदेशन व गोळ्या वाटप सुरू असताना.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना वरील  लसीकरणास वाढता प्रतिसाद मिळत आहे. केंद्रात शनिवार दि. २० मार्च अखेर २४५०  नागरिकांनी लस टोचून घेतल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्नकुमार चौगुले यांनी दिली.

       ४ मार्च पासून लसीकरण सुरू असले तरी सुरुवातीस लसीबाबत भीतीयुक्त संभ्रमावस्था होती. तथापि आठवडाभरात लस घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. सध्या ६० वर्षावरील तसेच ४५ ते ६० वर्षे वयोगटातील मधुमेह, ब्लड प्रेशर आदी व्याधीग्रस्त सर्व स्त्री-पुरुषांना मोफत लस देण्यात येत आहे. याशिवाय प्राथमिक व माध्यमिक शिक्षक-कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविका, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सक्तीचे लसीकरण शासकीय आदेशानुसार पूर्ण होत आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या त्रुटी व समस्यांवर मात करत डॉ. चौगुले यांनी नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, लस दिल्यानंतर रिएक्शनची शक्यता गृहीत धरून अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी प्रतीक्षा तथा समुपदेशन कक्ष स्थापन करून तेथे योग्य त्या सूचना व ताप आल्यास घेण्यासाठी  गोळ्या आदी देण्याची व्यवस्था केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

         नियमित रुग्ण सेवेसह लसीकरण  मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत परिश्रम घेत आहेत. 

No comments:

Post a Comment