ताम्रपर्णी नदीचे पात्र पडले कोरडे, कर्यात भागात पाण्याअभावी पिकांची होरपळ, पाणी नियोजनाची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2021

ताम्रपर्णी नदीचे पात्र पडले कोरडे, कर्यात भागात पाण्याअभावी पिकांची होरपळ, पाणी नियोजनाची गरज

कालकुंद्री नजीक कोरडेठाक पडलेले ताम्रपर्णी नदीचे पात्र.

कालकुंद्री : (विशाल पाटील / सी. एल. वृत्तसेवा)

     कोवाड नजीकच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालील ताम्रपर्णी नदीपात्र गेल्या पंधरा वर्षात प्रथमच ठणठणीत कोरडे पडल्यामुळे परिसरातील शेकडो एकर ऊस, मका आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे जंगमहट्टी धरणाचे पाणी तात्काळ नदीपात्रात सोडावे अशी मागणी होत आहे.

      कोवाड बंधारा नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गेल्या चार-पाच वर्षात सुरू होती. आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून ही दुरुस्ती सध्या सुरू आहे. तथापि ऐन उन्हाळ्यातील या कामास म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे पात्रात पाणी येण्यास विलंब झाला तर सर्व पिके पाण्याअभावी होरपळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे टाळण्यासाठी दोन-तीन पिलरचे काम तात्काळ पूर्ण करून त्यातून दोन-तीन दिवसात जंगमहट्टी धरणाचे पाणी खाली सोडावे व उर्वरित काम सुरू ठेवावे. अशी मागणी कोवाड, कागणी, कालकुंद्री, दुंडगे, कुदनुर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

        दरम्यान कोवाड बंधाऱ्याच्या खाली महाराष्ट्र हद्दीत दुंडगे व कामेवाडी हे दोन बंधारे आहेत. यात किटवाड नजीकच्या दोन धरणातील पाणी सोडल्यास व दोन्ही बंधारे किंवा दुंडगे बंधारा पूर्ण निदान निम्म्या क्षमतेनेही भरल्यास त्याचा साठा कोवाड बंधाऱ्यापर्यंत येतो. तथापि गळतीमुळे हा बंधारा पाणी साठवणुकीसाठी कुचकामी ठरला आहे. त्यामुळे हा बंधारा रुंदीकरण करून त्याचा उपयोग निदान वाहतुकीसाठी तरी करावा अशी मागणीही गेल्या काही वर्षांपासून परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारक करत आहेत. 

No comments:

Post a Comment