कोवाड बंधाऱ्यातून पाणी खाली सोडले, पिकांना जीवदान, पाटबंधारे विभागाची संवेदनशीलता - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2021

कोवाड बंधाऱ्यातून पाणी खाली सोडले, पिकांना जीवदान, पाटबंधारे विभागाची संवेदनशीलता

ताम्रपर्णी नदी पात्रात दुरुस्ती सुरू असलेल्या कोवाड बंधाऱ्यातून खाली सोडण्यात आलेले पाणी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड बंधाऱ्याखालील पूर्णपणे कोरड्या पडलेल्या ताम्रपर्णी नदीत पाटबंधारे विभागाने गेल्या दोन-तीन दिवसापासून पाणी सोडले. यामुळे परिसरातील पिकांना जीवदान मिळाले असून पाटबंधारे विभागाच्या नियोजना बद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त चंदगड लाईव्ह न्युजने सचित्र प्रसारित करून शेतकऱ्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या होत्या.

        कोवाड (ता. चंदगड) नजीक असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरूस्ती साठी ताम्रपर्णी नदी पात्र गेल्या वीस दिवसापासून कोरडे करण्यात आले होते. यामुळे परिसरातील ऊस, मका आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. दुरुस्ती कामाची गती पाहता पिकांची अवस्था गंभीर झाली असती. ही बाब सी एल न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या निदर्शनाला आणून देत बंधाऱ्याच्या दोन-तीन पिलर चे काम तात्काळ पूर्ण करावे व त्यातून जंगमहट्टी धरणाचे पाणी बंधाऱ्याखालील नदीपात्रात सोडावे अशी मागणी केली होती. या सूचनेला प्रतिसाद देत आमदार राजेश पाटील व पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून तीन पिलरचे काम पूर्ण करून गेल्या दोन दिवसापासून पाणी खाली सोडण्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी होरपळणाऱ्या पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. पाटबंधारे विभागाच्या या संवेदनशीलतेचे कोवाड, कागणी, कालकुंद्री, दुंडगे, कुदनुर आदी गावांतील शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे.

No comments:

Post a Comment