बीएलओ व पर्यवेक्षक राबताहेत पाच वर्षे विनामानधन, मानधनची वाट पाहून अखेर तहसीलदारांना मागणीचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

बीएलओ व पर्यवेक्षक राबताहेत पाच वर्षे विनामानधन, मानधनची वाट पाहून अखेर तहसीलदारांना मागणीचे निवेदन

बीएलओ व पर्यवेक्षक यांचे मानधन तात्काळ मिळावे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार संजय राजगोळे यांचेकडे देताना कर्मचारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी २०१७ पासून गेली पाच वर्षे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी तथा बीएलओ व त्यांच्यावर निरीक्षणासाठी नेमलेले पर्यवेक्षक फुकट राबताहेत. हे मानधन आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर असलेल्या प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, केंद्रप्रमुख आदींनी निराशेअंती शासनाकडे मानधन मागणीचे निवेदन सादर केले.

       वार्षिक पाच हजार मानधन देय असताना गेल्या पाच वर्षात एक रुपयाही मानधन मिळालेले नाही. आपल्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी मतदार याद्यांची कामे करण्या बरोबरच महिन्यातून किमान दोन वेळा व निवडणूक काळात आठवड्यातून किमान एकदा तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्यात  यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत व होत आहेत. आदेश देताना वार्षिक पाच हजार रुपये मानधन असल्याचे सांगण्यात आले होते. २०१७ पूर्वी काही वेळा ते दिले होते, तथापि गेल्या पाच वर्षात मानधन मिळालेच नाही. ते शासनाकडूनच आले नाही कि मधेच कुठे गायब झाले? याबद्दल बीएलओ, पर्यवेक्षकांसह जि. प., पं. स.  कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहे. शेवटी पाच वर्षे वाट पाहून सर्व कर्मचाऱ्यांच्या सह्यानिशी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यांना सादर केले.  

       तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार संजय राजगोळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी केंद्रप्रमुख वाय. के. चौधरी, डी. आय. पाटील, जी. व्ही. जगताप, दोरूगडे, डी. जी. कांबळे, भैरू भोगण, यशवंत कांबळे, धोंडीबा कुट्रे, नबीसाहब उस्ताद, सुजाता मुतगेकर, माया पाटील,  ज. ल. पाटील, अर्जुन पाटील, अजित पाटील, सागर मोरे आदींसह बीएलओ व पर्यवेक्षक उपस्थित होते. 

      यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक, मतदार यादी पुनरिक्षण, जनगणना यासारख्या कामाचे मानधन बऱ्याच वेळा गायब झाल्याचा अनुभव पाठीशी  असलेले कर्मचारी हे मानधन तरी मिळेल का? या संभ्रमात आहेत.

No comments:

Post a Comment