कोरोनाचा काजू उद्योगालाही फटका, शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान, शासनाने मद्यार्क निर्मितीस परवानगी द्यावी - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2021

कोरोनाचा काजू उद्योगालाही फटका, शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान, शासनाने मद्यार्क निर्मितीस परवानगी द्यावी

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

       कोट्यावधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग  दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे.  काजू उत्पादक शेतक-याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

        दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता.  दरवर्षीच्या जमाखर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकर्यानी तसेच काजू खरेदी व्यापारी व कारखानदारानीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत. काजू बागांमध्ये दिवसभर फिरून दोन किलो काजू जमा होत नसल्याने मजुरीही मिळेनाशी झाली आहे. तसेच काजू देतो असे सांगून व्यापार्‍यांकडून  शेतकऱ्यांनी काजु पोटी ॲडव्हान्स रक्कम उचलली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे.  गेल्या वर्षी काजूला प्रति किलो ७०  ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

        काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आले आहेत.  छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत.आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे.  याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे.एकंदरीत कारखानदार, व्यापारी,शेतकरी मजूर अडचणीत येणार आहेत.  

                                                  शामराव बेनके (काजू कारखानदार, माणगाव) 


  केळी, द्राक्ष कापूस,आदी पिकांची निसर्गाने हानी झाली तर शासन नुकसानभरपाई देते मात्र राज्याच्या कोकण पट्टट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्या वर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसानभरपाई दिली होती, त्याच प्रमाणे कोकणशी संलग्न असणाऱ्या चंदगड,आजरा,गडिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतक नुकसान भरपाई मिळावी. 

                                                  नितीन पाटील (बळीराजा, शेतकरी संघटना) 


           चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांची गरज 

तालुक्यात सरासरी दहा हजार टन काजू बीचे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे (मूरटा) उत्पादन होते.काजू बोंडांची गोव्याचे कारखानदार  कवडीमोल दराने खरेदी करतात. यामध्ये दलाल व्यापारी आणि मद्यार्क निर्मिती कारखानदार आजपर्यंत मालामाल झालेत. काजू पिकवणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला आहे. गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून काजूच्या फळावर योग्य प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे चंदगड तालुक्‍यातील सुमारे ४२ हजार टन काजू बोंड (मूरटा) जातो.  विक्रमी उत्पादन लक्षात घेता राज्य सरकारने चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांना परवानगी द्यावी.  

                       उदयकूमार देशपांडे (माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती)
1 comment:

Unknown said...

मद्यार्क निर्मिती ला परवानगी आणि विशेष अनुदान देवून शासनाने शेतकरीवर्गाने मदत केलीच पाहिजे.

Post a Comment