कालकुंद्री नजीक ११ केव्ही विद्युत वाहिनीचा गंजून धोकादायकरित्या खाली सरकलेला खांब, बाजूला खांबाचे मुळ ठिकाण. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी हून कालकुंद्री कडे जाणाऱ्या अकरा केवी विद्युत वाहिनीचा लोखंडी खांब पूर्णपणे गंजल्यामुळे धोकादायक बनला आहे. कालकुंद्री येथील काशिलिंग दूध संस्थेसमोर असणारा हा खांब तात्काळ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेसरी पासून कोवाड भागात आलेल्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीतून कागणी ते कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी परिसरात या वाहिनीतून वीज पुरवठा केला जातो. या वाहिनीला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली असून इतक्या वर्षात विविध कारणांनी अनेक खांब गंजून जीर्ण व धोकादायक बनले आहेत. बऱ्याच खांबांचा खालील भाग दोन तीन फूट गंजून निकामी झाल्याने पुन्हा वरचा भाग जमिनीला टेकला आहे. कालकुंद्री येथील दूध संस्थेसमोरील या खांबाने गंजल्यामुळे तुटून जागाच बदलली आहे. वादळी वारा प्रसंगी तारांना टांगलेल्या अवस्थेत असलेला हा खांब घड्याळाच्या लंबका प्रमाणे धोकादायकरित्या हलत असतो. याच खांबानजीक असलेल्या झाडाच्या फांद्यांना तारा घासल्यामुळे अनेक वेळा फांद्या पेट घेताना दिसतात. मुख्य रस्त्याला लागूनच असल्यामुळे वादळी वारा प्रसंगी इथून जाताना वाहने, नागरिक, पाळीव जनावरांसाठी जीवावरील खेळ बनला आहे. या खांबाची पाहणी करून वीज वितरण कंपनीने नवीन खांब बसवण्यासह तात्काळ उपाययोजना करावी. अशी मागणी प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment