दुंडगेचे प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ यांचा जागतिक सन्मान, एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेकडून क्रमवारी-२०२१ च्या शास्त्रज्ञांमध्ये स्थान - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2021

दुंडगेचे प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ यांचा जागतिक सन्मान, एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेकडून क्रमवारी-२०२१ च्या शास्त्रज्ञांमध्ये स्थान

प्रा. डॉ. एन. एल. तरवाळ

कागणी : एस. एल. तारिहाळकर / सी. एल. वृत्तसेवा

       दुंडगे (ता. चंदगड) येथील सुपुत्र व शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. एन. एल. तरवाळ यांना जागतिक सन्मान प्राप्त झाला. एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक शास्त्रज्ञ आणि विद्यापीठ क्रमवारी-२०२१ च्या सर्वेक्षणात डॉ. तरवाळ यांना जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

         ते युवा संशोधकामध्ये अव्वल ठरले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वाटचालीत हा एक मानाचा तुरा रोवण्याचे काम त्यांनी केले आहे. शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स, सायटेसन्स तसेच शोधनिबंध संबंधित रिव्युव्हर, संपादक म्हणून केलेले सर्व कार्य इत्यादी निकषाआधारे कलेल्या सर्वेक्षणानंतर शास्त्रज्ञांची जागतिक क्रमवारी ठरविली जाते.

         डॉ. तरवाळ यांनी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी संपादन केली असून डॉ. तरवाळ यांचे मटेरियल सायन्स मधील सोलार सेल, गॅस सेन्सर, सुपरकॅपॅसिटर, एलेक्ट्रोक्रोमीझम, सुपरहायड्रोफोबिसिटी, मेमरीस्टर या संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे. दक्षिण कोरिया येथील रिसर्च इन्स्टिट्यूट फ़ॉर सोलर अँड सस्टेनेबल एनर्जीज, ग्वाँजु इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी  येथून प्रा. जे. एच. जँग यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक्टरेटही पूर्ण केली. तेथेच त्यांनी कमी खर्चिक अशा सीआयजीएस आणि सीझेडटीएस सौरघरांची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये यश मिळविले आहे.               सध्या डॉ. तरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांची पीएच. डी. साठी नोंदणी केली आहे. आजवर त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ७५ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांना १७४० हुन अधिक सायटेशन मिळाली आहेत. त्यांचा एच इंडेक्स २७ असून आय टेन इंडेक्स ४५ इतका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्रसिद्ध होणाऱ्या विविध "संशोधन पत्रिकांचे ते रेफ्री व एडीटर म्हणून काम पाहत आहेत . त्यांनी ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेतून आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदामध्ये त्यांनी वक्ता म्हणून संशोधनपर व्याख्याने दिली आहेत. 

           ते दक्षिण आफ्रिकेच्या नायझेरिया विद्यापीठाशी शैक्षणिक व संशोधन सांमजस्य करारासाठी समन्वयक म्हणुन काम पाहत आहेत. डॉ. तरवाळ यांनी  यापूर्वी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले.  यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सातारा जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून आयोजन केले होते.  प्राचार्य डॉ. आर व्ही. शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेची उभारणी केली तसेच विद्यार्थी संशोधन मेळावा आणि राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केले होते.                        त्यांना श्रीलंकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये “युवा  शास्त्रज्ञ” आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे  “यंग असोसिएट फेलो”  म्हणून गौरव केला आहे. त्यांना मुंबई येथे "समाजभूषण" पुरस्कारानेही गौरविले आहे. डॉ. तरवाळ हे ज्या विद्यार्थीभवनमध्ये शिकले त्याच विद्यार्थीभवन (कमवा आणि शिका) चे अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.No comments:

Post a Comment