चंदगडच्या नेत्यांनी गुप्तपणे विजयाची मोट बांधली असती तर.......स्वीकृत संचालक पदाचा मान चंदगडला मिळवा - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2021

चंदगडच्या नेत्यांनी गुप्तपणे विजयाची मोट बांधली असती तर.......स्वीकृत संचालक पदाचा मान चंदगडला मिळवा

स्वीकृत संचालक पदाचा मान चंदगडला मिळवा,  दुध उत्पादकांची मागणी 

नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

      जिल्ह्याच्या राजकारणात केवळ चंदगडच्या मतांचा पुरेपूर वापर करण्यात आला आणि चंदगडच्या उमेदवारांना मात्र ठेंगा दाखवण्यात आला. काही तालुक्यातील दोन्हीं गटांच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर विजयाची मोट गुप्त पद्धतीने बांधली. मात्र चंदगड तालुक्यात ते झाले नाही. त्यामुळेच चंदगडच्या दोन्हीही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा निकालानंतर ऐकायला मिळत आहे. 

           तालुक्यातील स्थानिक नेत्यांचा प्रामाणिकपणा व जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रती असलेल्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीत चंदगड तालुक्याला एकही संचालकपद मिळाले नाही. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. ३० वर्षांनंतर चंदगडला विना संचालक कारभार पहावा लागणार आहे. सत्ताधारी आघाडीकडून विद्यमान संचालक दिपक पाटील तर विरोधी आघाडीकडून आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. विजयासाठी दोन्ही आघाड्यांकडून पराकोटीचा संघर्ष पाहायला मिळाला. एक-एका मतासाठी दोन्ही आघाडीला मोठा संघर्ष करावा लागला. तालुक्यात ३४६ ठराव असलेने दोन्ही आघाडीचे दोन्हीही उमेदवार विजयी होतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती. पण जिल्ह्यातील नेत्यांच्या हुशारीमुळे तालुक्यातील दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

       दिपक पाटील हे सलग १२ वर्षे संचालक होते, तर आमदार राजेश पाटील हे ७ वर्षे संचालक होते. पारंपरिक विरोधक असूनही दोन्ही संचालकांनी दूध वाढीसाठी चांगले प्रयत्न केले होते. मात्र दोन्ही उमेदवारांच्या पराभवामुळे दूध उत्पादक शेतक-यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

     चंदगडची संचालकपदाची पाटी ३० वर्षानंतर कोरीच...........

          गोकुळ दुध संघाला चंदगड तालुक्यातून म्हैशीचे मोठ्या प्रमाणावर दर्जेदार दुध पुरवठा केला जातो. पण कालच्या निकालात चंदगडच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चंदगडची पाटी ३० वर्षानंतर कोरीच राहिली. चंदगडला प्रतिनिधीत्व देताना स्वीकृत संचालक पदाचा मान देऊन पराभवाचा परिमार्जन करावे अशी मागणी दुध उत्पादकातून होत आहे.  

                 दोन संचालकपदाची मागणी........निकालानंतर तालुका संचालकमुक्त.......

    गोकुळची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील ठरावधारक व तालुक्यातून होणारा दुधाचा पुरवठा पाहता तालुक्याला दोन संचालकपदे मिळतील अशी अनेकांना आशा होती. त्यादृष्टीने मोर्चबांधणीही झाल्याचे दिसले. मात्र निकालानंतर संपुर्ण चित्रच पालटले. दोन संचालकपदे मिळवणे तर सोडाच चंदगड तालुका संचालकमुक्त झाला. निकालानंतर याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. 




No comments:

Post a Comment