पारगड नजीक वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2021

पारगड नजीक वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

पंधरा दिवसापूर्वी पारगडच्या दक्षिण प्रवेशद्वाराकडील वळण रस्त्यावर बसलेला बिबट्या

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      किल्ले पारगड नजीक दोडामार्ग तालुका हद्दीत असलेल्या तेरवण येथे बिबट्या वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाली. गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरातील धनगर व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा कोनाळ वन परिमंडळ चे वनपाल शिरवळकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

      तेरवण येथील शेतकरी महादेव धाकु काळे यांनी सर्व जनावरांना जंगलात चारल्यानंतर सायंकाळी गोठ्यात बांधले होते. गोठ्यात बांधलेल्या गायीवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून हरडा फोडला. या झटापटी वेळी अन्य जनावराने ओरडू लागली याची चाहूल लागताच काळे व अन्य शेतकरी तिकडे धावले. आरडाओरड करताच बिबट्या पळून गेला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गायीला वाचवण्याचे केलेले प्रयत्न मात्र निष्फळ ठरले. 

      काही दिवसापूर्वी किल्ले पारगड च्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळील वळण रस्त्यावर निवांत बसलेला बिबट्या हाच असावा, अशी चर्चा आहे. त्याचे  देविदास चीरमुरे (पारगड) यांनी चार चाकी मधून जाताना काढलेले छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. किल्ले पारगड वर जाणारे पर्यटक व नागरिकांनी या परिसरात जाताना दक्षता बाळगावी असे आवाहन चंदगड व दोडामार्ग वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment