चंदगड तालुका पत्रकार संघाचा २७ वा वर्धापनदिन ऑनलाईन उत्साहात संपन्न, - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2021

चंदगड तालुका पत्रकार संघाचा २७ वा वर्धापनदिन ऑनलाईन उत्साहात संपन्न,

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका पत्रकार संघाचा २७ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त झालेल्या  कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकार ऑनलाइन सहभागी झाले होते.

         सत्तावीस वर्षांपूर्वी २० मे १९९४ रोजी चंदगड तालुका पत्रकार संघाची स्थापना झाली होती. गेल्या सत्तावीस वर्षात पत्रकार संघाने विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल च्या माध्यमातून बातम्या देऊन सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या व मागण्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, अन्यायाला वाचा फोडणे, चांगल्या व आदर्श गोष्टींना प्रसिद्धी देणे, यासह तालुक्यातील दुष्काळ, अतिवृष्टी, पूरस्थिती, वादळ, कोरोना संकट आदी प्रसंगीचे वास्तववादी लेखन व चित्रण केले आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोना काळात गत वर्षी परप्रांतीयांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी केलेले कार्य, संकट समयी गरजूंना धान्य व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, विविध प्रसंगी रुग्णांना फळे वाटप, गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन व मार्गदर्शन, मुख्यमंत्री, पंतप्रधान सहाय्य निधीसाठी केलेली मदत, चंदगड तालुक्यातील जनतेसाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणून गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू केलेल्या 'चंदगड लाईव्ह पोर्टल चॅनल'च्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य असे अनेक उपक्रम सुरू आहेत. यापुढील काळातही अनेक उद्दिष्टे प्रस्तावित आहेत. 

        याची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने गतवर्षी चंदगड पत्रकार संघाला 'राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ'पुरस्कार देऊन अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविले आहे. यापुढील काळातील तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादावर पत्रकार संघाचे कार्य अखंडपणे पुढे सुरू राहणार आहे.

            २७ व्या  वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी संस्थापक सदस्य उदयकुमार देशपांडे, विद्यमान अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव चेतन शेरेगार, खजिनदार तथा सी एल न्यूज चॅनलचे संपादक संपत पाटील, सदस्य संजय के. पाटील,  प्रदिप पाटील, संजय मष्णू पाटील, संतोष सुतार, तातोबा गावडे, राजेंद्र शिवणगेकर, निवृत्ती हारकारे, संदिप तारीहाळकर, प्रकाश ऐनापुरे, महेश बसापुरे, नंदकिशोर गावडे, विशाल पाटील, शाहनुर मुल्ला, लक्ष्मण आडाव 

        आदी पत्रकार ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कोरोना अन्य कारणांनी निधन झालेल्या मान्यवर व्यक्ती व तालुका वासीयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तर आजारी असलेल्या ना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे स्वागत श्रीकांत पाटील यांनी तर प्रास्ताविक चेतन शेरेगार यांनी केले. उदयकुमार देशपांडे यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment