कर्यात भागात धुळवाफ पेरणीची धांदल, खतांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांत संताप - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2021

कर्यात भागात धुळवाफ पेरणीची धांदल, खतांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांत संताप

कालकुंद्री शिवारात कुरीच्या साह्याने धुळवाफ पेरणीत व्यस्त असलेले शेतकरी कुटुंब.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात खरीप हंगामातील भात पिकाच्या धुळवाफ पेरण्या गतिमान झाल्या आहेत. कोरोनाचे  भय दूर सारून परिसरातील बळीराजा पेरणीपूर्व अंतिम मशागती व धुळवाफ पेरण्यांत सहकुटुंब व्यस्त झाल्याचे चित्र आहे. 

      जिल्ह्यातील भात पिकाचे कोठार समजल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातील माणगाव ते राजगोळी पर्यंतच्या पट्ट्यात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलीकडे ऊस पिकाखालील जमीन वाढली असली तरी येथील भाताचा बाज अद्याप टिकून आहे.  मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्रात धुळवाफ पेरणीसाठी इकडे पाच पात्यांच्या कुरीचा  वापर सर्रास शेतकरी करतात. यामुळे कमी मनुष्यबळ व कमी श्रमात जास्त क्षेत्रावर पेरणी करता येते.

    यंदा तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. ती गतिमान होण्याबरोबरच गेल्या चार दिवसात 'धूळपेरणी' ची धांदल उडाली आहे.  सध्या कृषी केंद्रावर सोनम, दप्तरी, इंद्रायणी, बासुमती, आर वन, टायचुंग, वाय एस आर, श्रीराम, ३१२, अमन, रत्नागिरी आदी संकरित बियाणे उपलब्ध आहेत. यातील बहुतांशी जातींच्या भातावर वर्षभर साठवणुकी वेळी गुणगुणे, सुरूम, टोके, भोंगे सारखी किड पडत असल्याने  साठवणुकीसाठी अयोग्य असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा किडीला प्रतिकार करणाऱ्या पारंपरिक वाणांच्या शोधात अनेक शेतकरी आहेत. सद्या कालकुंद्री, कुदनूर, किणी, नागरदळे, कोवाड, निटुर, कागणी, म्हाळेवाडी आदी गावांत पेरण्यांचा जोर आहे. दिवसागणिक गगनाला भिडणारे खतांचे, किटकनाशके व बियाण्यांचे दर यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

No comments:

Post a Comment