कोरोनाबळी शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली सेवेत तात्काळ सामावून घेण्याची फेडरेशनची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2021

कोरोनाबळी शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली सेवेत तात्काळ सामावून घेण्याची फेडरेशनची मागणी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          मार्च 2020 पासून देश व राज्यामध्ये कोविड-19 च्या प्रादूर्भावाने हजारोंच्या संख्येने  शिक्षकांचा कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत झाला .राज्यातील कोरोना बाधितबळी शिक्षक व शिक्षाकेतर बंधू भगिनी यांची संख्याही लक्षणीय आहे.त्यामुळे ज्या कुटुंबातील दुर्दैवी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोनामुळे आकस्मिक निधन झाले,त्या कुटुंबाची कोरोनाच्या परिणामी आधीच आर्थिक डबघाईमुळे फारच ससेहोळपळ झाल्याने निराधार अवस्था झालेली दिसून येते. अशा सर्वाना शिक्षण सेवेत सामावून घेण्याची मागणी महाराष्ट्र माधामिक शिक्षक संघाने केली आहे.

        राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आकस्मिकरित्या एखादा शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी याचे दुःखद निधन झाल्यास,त्या संस्थेत/शाळेत संबंधित शिक्षक कर्मचारी याच्या वारसदारांना शैक्षणिक पात्रतेनुसार तातडीने नोकरीत सामावून घ्यावे व त्या कुटुंबास संकटसमयी हातभार लावावा यासाठी शासनाची"अनुकंपा योजना"कार्यरत आहे.मात्र या योजनेची सन 1976 ते आजमिती पर्यंतची वाटचाल पाहता किरकोळ अपवाद वगळता अतिशय "कुर्मगती" व शिक्षणाधिकारी कार्यालय व संबंधित शिक्षण संस्था यांच्या मर्जीचा विषय ठरविल्यासारखी अमलबजावणी दिसून येते.त्यामुळे वर्षांनुवर्षें दिवंगत शिक्षकांच्या वारसांना संस्थाचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयात लाचार हेलपाटे मारावे लागल्याचे भीषण चित्र अनुभवास येते.त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालय व संबंधित दिवंगत शिक्षकाची संस्था यातील अमानुष साटेलोटे यामुळे शासनाच्या"अनुकंपा"योजनेचा मूळ हेतूच पायदळी तुडविला जातो.याची साक्ष राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील विद्यमान प्रलंबीत अनुकंपा प्रकरणे देत आहेत.

            काही संस्थाचालकांना एखादा शिक्षक/कर्मचारी आकस्मिक दिवंगत झाल्याने रिक्त झालेल्या पदावर "अनुकंपा"टाळून नेहमीच्या शिरस्त्यानुसार वा सवयीनुसार "अर्थपूर्ण उमेदवाराची" निवड करण्याची चालून आलेली "आयती संधी"वाटते.म्हणून अशा ठिकाणी अनुकंपा हा संबंधित नियोक्त्यांच्या मर्जीचा विषय ठरतो.त्यातून वेगवेगळे "बायपास मार्ग"अवलंबिले जातात.

           असे दुर्दैवी अनुभव टाळण्यासाठी "कोरोना"मुळे दुर्दैवी निधन झालेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदावर सुयोग्य वारसदार उमेदवारांची प्राधान्याने नियुक्ती होणे आवश्यक आहे.त्यासाठी शासनाने या विषयी स्वतंत्रपणे व तातडीने "अनुकंपा"योजनेचा लाभ कोरोना बळींच्या वारसदार उमेदवारांना "विशेष बाब"म्हणून संबंधितांना निर्देश देणेबाबत तातडीने आदेश प्रसृत करावे,अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ने दि.2 डिसेंबर 2020 रोजी मा.मुख्यमंत्री महोदय  यांचेकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे.

        महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)च्या मागणीची शासनाकडून संवेदनशीलतेने तातडीने दखल घेतली जाईल असा आम्हास विश्वास वाटत असल्याचे ज्ञानेश्वर कानडे, अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) पालघर यानी व्यक्त केला आहे.No comments:

Post a Comment