अन् माणगावचा प्रकाशमान सुरज मावळला! - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2021

अन् माणगावचा प्रकाशमान सुरज मावळला!

मयत सुरज चिंचणगी

तेऊरवाडी / एस. के. पाटील

       नाविन्याचा ध्यास घेवून वाटचाल करणारा माणगाव (ता. चंदगड) येथील एक उमदा युवक सुरज दत्तू चिंचणगी पोहताना पाण्यात बुडून काळाच्या पडद्याआड गेला. परवापर्यंत हसत खेळत असलेला सूरज आता या जगातूनच निघून गेल्याने माणगांवचा हा प्रकाशमान सुरज कायमचा मावळला.
     खूपच दुर्दैवी आणि मनाला चटका लावुन जाणारी घटना घडली. पोहायला गेलेला सूरज धरणात बुडाला हे कुणालाच पटण्यासारखं नव्हतं. सूरज कुठेतरी धरणाच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेला असावा आणि तो उठून परत यावा असं वारंवार वाटत होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
       आपल्या वागण्याने, आचरणाने प्रत्येकाला आपलंसं करून घेणं हे खूप क्वचित लोकांना जमतं. त्यांपैकीच एक म्हणजे सूरज. कमी वयात असलेली सूरजची शिष्टाचाराची जाण पाहिल्यावर तो जन्मत:च शिष्टाचाराचं आणि सुसंस्कारांचं बाळकडू घेवून आलाय की काय असं वाटावं. थोरा-मोठ्यांशी नेहमी आदराने आणि नम्रपणे वागणाऱ्या सूरजला पाहिल्यावर त्याचा नेहमीच हेवा वाटायचा. सूरज ज्या-ज्या वेळी मित्रांना भेटायचा त्या त्या वेळी तो थांबून 'दादा' अशी प्रेमळ हाक मारत हसत बोलायचा. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य मुळीच कमी होत नसायचं. चेहऱ्यावर कायम प्रसन्नता आणि डोळ्यांत सकारात्मकतेची चमक दिसायची. त्याच्या बोलण्यातून त्याची एक वेगळीच निरागसता जाणवायची. अतिशय शांत आणि हुशार असलेल्या सूरजचा अगदी कमी वयात सुद्धा असलेला सामंजस्यपणा पाहून थक्क व्हायला व्हायचं..!
      सैन्यात भरती होवून देशरक्षण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून सूरज सतत प्रयत्न करत होता. बी. एस. स्सी -३ मध्ये शिकत असतानाही सैन्यात जाण्यासाठी धडपड करणाऱ्या सूरजला दररोज अगदी मनापासून फिजीकल करत असताना त्याचा मित्र अरूणने कित्येकदा पाहिलंय. त्याची फिजीकलची तयारीही अतिशय उत्तम होती. त्याचं व्यक्तिमत्त्व नजरेत भरणारं असंच होतं. प्रत्येकाचं मन राखणारा सूरज सर्वांनांच प्रिय होता. सुरजच्या अकाली जाण्याने आपण एका होतकरू व मनमिळावू व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. 
         'मनाला चटका लावुन सूरज अनंतात विलीन झाला. त्याचा सदैव हसरा - निरागस चेहरा, तुझं नम्रपणे आणि आदराने बोलणं, शिष्टाचारानं वागणं, तुझं सोज्वळ व्यक्तिमत्त्व सारं काही कायम सर्वांच्या लक्षात राहील. नावाप्रमाणे सूर्यच असणारा सूरज इतक्या लवकर मावळशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो आपली सारी स्वप्नं मागे ठेवून निघून गेलास कायमसाठी. सूरज सगळ्यांनाच हवा होतास सूरज. खूप वाईट झालं. खरंच असं व्हायला नको होतं. आज सुरजचा वाढदिवस, पण त्याच्या वाढदिवशी तुला श्रध्दांजली अर्पण करावी लागेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सूरजच्या गोड स्मृतींचा नंदादीप आम्हां प्रत्येकाच्या मनात कायम तेवत राहील..!!'  
        "एक सूरज' था जो तारोंके घराने से चला गया, शख़्स ज़माने का भला था वह चला गया l"
      अशा शद्बात अरूण चिंचणगी याने सुरजच्या आठवणीना उजाळा दिला तो मन सुन्न करणारा आहे. लॉक डाऊन असल्याने असे बरेच युवक पोहण्याचे धाडस करत आहेत. यातून अशा मोठ्या दुर्घटना घडत आहे .पालकांनी या संदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment