चंदगड तालुक्यातील शाळांचे `तोक्ते` वादळाने नुकसान, वाचा कोणत्या गावातील आहेत शाळा - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2021

चंदगड तालुक्यातील शाळांचे `तोक्ते` वादळाने नुकसान, वाचा कोणत्या गावातील आहेत शाळा

खन्नेटी शाळेवर झाड पडून झालेले नुकसान.

 चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   काल झालेल्या तोक्ते चक्रीवादळाचा फटका चंदगड तालुक्यातील शाळांनाही बसला आहे. यात काही शाळांचे छत उडून गेले तर काही शाळा इमारती, कंपाऊंड व पाण्याच्या टाक्यांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. अशी माहिती शिक्षण विभाग चंदगड मधून देण्यात आली आहे.

कोकरे येथे शाळेवर झाड पडून झालेल्या नुकसानीची पाहणी करताना जि प सदस्य बल्लाळ, सभापती कांबळे, अभियंता सदावरे, मुख्याध्यापक पवार आदी.

       कोकरे, शाळा इमारतीवर झाड कोसळून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. कुरणी शाळे नजीकचे झाड शाळा कंपाऊंड, पाण्याची टाकी व प्रवेशद्वारावर कोसळल्याने, वाघोत्रे शाळेच्या स्वच्छता गृहावर झाडाची फांदी मोडून पडल्याने, इसापूर, फाटकवाडी, मांडेदुर्ग शाळांचे छप्पर वादळाने उडाल्यामुळे, खन्नेटी शाळेचे झाड पडून नुकसान झाले आहे. शाळांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तालुक्यातील अजून काही शाळांचे वादळामुळे नुकसान झाले आहे का! याचा शिक्षण विभागा मार्फत आढावा सुरू आहे.

         तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरे, कुरणी जिप. शाळांना तात्काळ भेटी देऊन जि प सदस्य सचिन बल्लाळ, पंस. सभापती ॲड. अनंत कांबळे, स शि मो अभियंता विजय सदावरे, गशिअ सौ एस एस सुभेदार, केंद्रप्रमुख जी बी जगताप आदींनी  नुकसानीची पाहणी केली.

           नुकसान झालेल्या शाळांनी नुकसानीचे पंचनामे करून दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत अशा सूचना जि प सदस्य सचिन बल्लाळ यांनी केल्या. तर चंदगड तालुक्यातील  शाळांच्या आवारात जीर्ण, धोकादायक तसेच वाळवी लागून कमकुवत झालेली झाडे असतील तर ती तोडून टाकावीत. याबाबतचे लेखी परिपत्रक  शिक्षण विभागाने तालुक्‍यातील सर्व शाळांना पाठवावे अशी सूचना केली.

       भेटीप्रसंगी कुरणी, कोकरे येथील शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment