'चंदगडला' कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय; स्वॅब साठी स्वतःहून पुढे येण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2021

'चंदगडला' कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय; स्वॅब साठी स्वतःहून पुढे येण्याची गरज

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' नंतर बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना ॲम्बुलन्स मधून स्वॅब साठी नेण्याची धडपड करताना आशा स्वयंसेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन, व दक्षता कमिटीचे सदस्य.

कालकुंद्री : (विशाल पाटील) सी एल वृत्तसेवा

 कोरोना च्या दुसऱ्या लाटेत एप्रिल अखेरपर्यंत काहीसा मंदगतीने असलेला कोरोना मे महिन्यात अक्राळविक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. चंदगड तालुक्याला कोरोना चा विळखा एक मे पासून दिवसेंदिवस अधिकच आवळत चालला आहे. एप्रिल महिनाअखेर ५-१० इतका काहीसा नियंत्रणात असलेला रोजचा पॉझिटिव्हिटी दर केवळ दहा-बारा दिवसात पन्नाशी ओलांडताना दिसत आहे. याचे मुख्य कारण बाधित रुग्णाच्या सानिध्यातील लोक तपासणीसाठी स्वतःहून पुढे येत नाहीत हेच आहे. लोकांच्या आजार लपवण्याच्या मानसिकतेमुळे प्रशासन व्यवस्था हतबल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

        तुटवड्यामुळे लसीकरणाला होत असलेला विलंब आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य विभाग व प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. एप्रिल महिनाअखेर पासून बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शासनाच्या वतीने 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' मोहीम सुरू आहे. या मोहिमेत बाधित रुग्णाच्या प्रथम संपर्कातील (हाय रिस्क) व द्वितीय संपर्कातील (लो रिस्क) व्यक्तींच्या याद्या करण्याचे काम सुरू आहे. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या जोडीला प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षिका युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. बाधित रुग्णाच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील याद्या वेळच्या वेळी तयार होत असल्या तरी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपली तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत तसे होत नसल्यामुळे हे संशयित आपले कुटुंबीय व गाव धोक्यात आणत आहेत. सध्या अक्सिजन, ऑक्सीजन बेड, अतिदक्षता विभागातील बेडची कमतरता व खाजगी हॉस्पिटल मधील लाखोंच्या घरात असलेले सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील उपचाराचे दर लक्षात घेता कोरोना ला प्राथमिक अवस्थेतच हरवणे गरजेचे आहे. त्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीने तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे व इतरांनाही प्रवृत्त करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार आदींनी केले आहे.

एकंदरीत कोरोना च्या बाबतीत लोकांचे सहकार्य असल्याशिवाय केवळ आरोग्य विभाग व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धडपडीला यश लाभणे कठीण आहे.

No comments:

Post a Comment