![]() |
कोवाड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडकलेला कचरा. |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात कचरा अडकला आहे. यामुळे ताम्रपर्णी नदीतील पाण्याच्या विसर्गाला मोठा अडथळा निर्माण झाला असून हा कचरा काढण्यास मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात विध्वंसक महापुरामुळे नरक यातना भोगणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारी व कोवाड ग्रामस्थांसाठी नदीपात्रातील हा अडथळा यावर्षीही मोठ्या संकटाची पूर्वसूचना देणारा ठरत आहे. यावर्षी मृगाच्या पहिल्याच पावसात नदीचे पाणी बंधार्यावरून दोन फूट वाहत होते. महापूराची चाहूल लागताच व्यापारी वर्गाने आपापल्या दुकानातील साहित्य हलवण्यास सुरुवात केली होती. तथापि पावसाने गेल्या पाच-सहा दिवसात उघडीप दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. महसूल प्रशासनानेही नदीकाठावरील घरमालक व व्यापारी यांना नोटीसद्वारे सतर्कतेच्या पूर्वसूचना देऊन आपल्या अंगावरील बाजूस झटकली आहे.पावसाने उसंत दिल्यामुळे नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यात अडकलेली झाडेझुडपे व कचरा युद्ध पातळीवर साफ करण्याची गरज आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास हा कचरा महापूरास आमंत्रण देणारा ठरू शकतो. यापूर्वी दगडी असलेले बंधाऱ्याचे पिलर काढून उन्हाळ्यात सिमेंट काँक्रेटचे बनवले आहेत यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होतो की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
दोन दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाने तालुक्यातील भोगोली बंधाऱ्यात अडकलेली झाडेझुडपे जेसीबीच्या साह्याने काढून बंधारा खुला केला आहे. तीच तत्परता कोवाड बंधाऱ्या बाबत दाखवण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment