बेंदूर पार्श्वभूमीवर बकरी बाजार तेजीत, बैल होताहेत दुर्लक्षित - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2021

बेंदूर पार्श्वभूमीवर बकरी बाजार तेजीत, बैल होताहेत दुर्लक्षित

 बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर फिरत्या बकरी बाजारांना  प्रतिसाद लाभत आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        दरवर्षी महाराष्ट्र बेंदूरच्या एक महिना आधी कर्नाटकी बेंदूर येतो. कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक भागात हाच सण साजरा होतो. जून महिन्यात नवीन पाणी, पावसामुळे हवेत वाढलेला गारठा अशा 'पोषक' वातावरणामुळे या सणाला मांसाहारी बेत असतो. यात रक्ती मंडळे पुढे असतात. कोरोना पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद असल्यामुळे मंडळांना बकरी पुरवण्यासाठी फिरते बकरी बाजार सुरू झाले आहेत. यांना गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे.  ८ ते २० हजार किमतीची  शेकडो बकरी आठवडाभरात चंदगडच्या पूर्वेकडील 'कर्यात भागात' विकल्याची माहिती एका व्यापाऱ्याने दिली.

        'बेंदूर' हा वर्षभर शेतात राबणाऱ्या बळीराजाचे मित्र किंबहुना दैवत असलेल्या बैलांचे पूजन करण्याचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बैलांना कामातून विश्रांती देऊन त्यांच्या अंगाला काव लावणे, शिंगे रंगवणे, रंगीबेरंगी झूली घालून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढणे, बैलांना व पशुधनाला पौष्टिक व गोडधोड खाऊ घालणे. पंचारती ने ओवाळून औक्षण करणे, घरांच्या प्रवेशद्वारावर पिंपळ पानांची तोरणे बांधणे, साठवून ठेवलेले धान्य साठ्यांचे पूजन करणे. असा बेंदूर सणाचा उत्साह असतो. तथापि असे दृश्य गेल्या वीस- पंचवीस वर्षात दुर्मिळ झाले आहे. सकाळी घाईगडबडीत चौकटीवर पिंपळ पानांचे तोरण बांधून रक्ती तथा रस्सा मंडळाकडे अधिक वेळ देण्याकडे कल वाढला आहे. याकाळातही बैलांना दैवत मानणारे शेतकरीही आहेत ही बाब दिलासादायक आहे. चंगळवादाकडे दुर्लक्ष करून आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या अशा चांगल्या परंपरांचे जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment