कष्ट, संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर नेसरीचा शार्दूल मुंबई महानगरपालिकेत - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2025

कष्ट, संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर नेसरीचा शार्दूल मुंबई महानगरपालिकेत

 


नेसरी :  सी एल वृत्तसेवा

        गावातील शार्दूल गोविंद कामत या शांत व सुस्वभावी तरुणाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवत मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अधिकारी पदावर आपली निवड पक्की केली. त्याच्या या यशाबद्दल नेसरी वाचन मंदिरतर्फे अजितसिंह शिंदे नेसरीकर यांच्या हस्ते शार्दूलचा सत्कार करण्यात आला. 

     शार्दूलची कहाणी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. आईचे निधन झाल्यानंतर आजारी वडिलांची सेवा, घरातील कामे आणि अभ्यास असा त्रिसंध्येचा प्रवास त्याने जिद्दीने केला. या कठीण परिस्थितीतही त्याने हार न मानता अपार कष्टातून यश संपादन केल्याची भावना वसंतराव पाटील, मार्तंड कोळी, रवींद्र हिडदुगी, पांडुरंग करंबळकर यांनी मनोगतात व्यक्त करत शार्दूलचे कौतुक केले.

        यावेळी शार्दूल म्हणाला, कष्ट करा, जिद्दीने पुढे जा, यश तुमचेच आहे असे विद्यार्थ्यांना सांगून या पदावर मी समाधानी नसून यापुढे आणखीन अभ्यास करून प्रथमश्रेणी अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे. तो दिवस ही लवकरच येईल असा आशावादही त्याने व्यक्त केला. प्रारंभी शार्दूलच्या हस्ते स्वामी विवेकानंद व मेजर सत्यजित शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रास्ताविक व स्वागत टी. बी. कांबळे यांनी केले. याप्रसंगी शिवाजीराव पाटील, प्रल्हाद माने, आप्पासाहेब कुंभार, विष्णू रेडेकर, अनिल हळीज्वाळे, ग्रंथापाल शीतल शिंदे आदी मान्यवरंसह विद्यार्थी  उपस्थित होते. माधुरी कुंभार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment