‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार’ पुस्तकाचे प्रकाशन, दि न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक संजय साबळे यांचे सतरावे पुस्तक - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2025

‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार’ पुस्तकाचे प्रकाशन, दि न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक संजय साबळे यांचे सतरावे पुस्तक

 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” आणि “पुस्तक प्रकाशन सोहळा” उत्साहात पार पडला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य मान. व्ही. एन. कांबळे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. ज्येष्ठ अध्यापिका विद्या डोंगरे यांनी प्रास्ताविक केले, तर भाग्यश्री पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

    अध्यापिका वैशाली पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले, “वाचन हीच विद्यार्थी जीवनातील सर्वांत प्रभावी सवय असून त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडते.”

        कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे दयानंद गुरव यांच्या हस्ते विद्यालयाचे शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे संपादित ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विविध ग्रंथांचे वाचन करून संकलित केलेल्या विचारांवर आधारित असून, साबळे यांचे हे सतरावे पुस्तक आहे.

    साबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी “वाचन कट्टा” सारखे विविध उपक्रम राबवले असून, या पुस्तकातूनही त्याच उपक्रमाला नवी प्रेरणा मिळाली आहे. प्रमुख वक्ते दयानंद गुरव म्हणाले, “ज्यांना पुस्तक वाचता येतात, त्यांना माणसं वाचता येतात, आणि ज्यांना माणसं वाचता येतात, त्यांना माणसंही वाचवता येतात.”

    कार्यक्रमानिमित्त ग्रंथपाल शरद हदगल यांनी आकर्षक ग्रंथप्रदर्शन भरविले. प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक व्ही. एम. मोहणगेकर, भूषण पाटील, ओंकार पाटील, साधना भोसले, प्रियाराणी बुरूड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर एस. पी. कोळी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment