![]() |
मोटणवाडी तिलारी नगर या सात किमी रस्त्याची झालेली दुरावस्था. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मोटणवाडी- तिलारी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूर जिल्हा व बेळगाव परिसराला सिंधुदुर्ग गोव्याशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा व जवळचा मार्ग आहे. नावालाच राज्य मार्ग असलेल्या या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुर्दशा झाली आहे. सुमारे सात किलोमीटर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे म्हणजे अग्निदिव्य ठरत आहे. या मार्गावरील पार्ले, कळसगादे, झेंडेवाडी, मालुसरेवाडी, कोदाळी, तिलारीनगर परिसरातील लोकांना चंदगड, बेळगाव कडे येजा करणे कठीण झाले आहे. या परिसरातील अनेक विद्यार्थी व कामगार सावंतवाडी, गोवा व कोकणात नेहमी ये जा करतात. तर चंदगड, कोल्हापूर, गडहिंग्लज व बेळगाव आगाराच्या बस याच मार्गावरून दोडामार्ग, पणजी कडे ये-जा करत असतात. तथापि या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांसह वाहनधारकही खिळखिळे झाले आहेत. अनेकांना मणक्याचे आजार उद्भवले आहेत. हा रस्ता दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा मागणी करूनही संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे.
कोकण व घाटमाथा पर्यायाने महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या व्यापारी, शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या व जवळच्या असणाऱ्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी होत आहे.
हा रस्ता झाल्यास प्रवासी व ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्याबरोबरच तिलारी, पारगड किल्ला पट्ट्यातील पर्यटनालाही चालना मिळेल.
No comments:
Post a Comment