संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाची दूरदृष्टी महत्वाची - डाॅ. दत्ता पाटील, चंदगड येथे रवळनाथतर्फे मान्यवरांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाची दूरदृष्टी महत्वाची - डाॅ. दत्ता पाटील, चंदगड येथे रवळनाथतर्फे मान्यवरांचा सत्कार

चंदगड येथील रवळनाथ हाऊसिंग सोसायटी मध्ये पत्रकार नंदकुमार ढेरे यांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले, बाजुला डाॅ. पाटील, सौ. नेसरीकर, डॉ. साळुंके, गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार, शिंदे, मायदेव आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         स्पर्धात्मक युगात एखादी संस्था निर्माण करून ती लोकाभिमुख करायची असेल तर संचालक मंडळाकडे दूरदृष्टी असणे महत्त्वाचे असते. दूरदृष्टी असणारी लोकं ज्या संस्थेत आहेत, त्या संस्थेचे अल्पावधीत वटवृक्षात रूपांतर होत असते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता पाटील यानी केले.

       चंदगड येथे रवळनाथ को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन एम. एल. चौगुले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर यांनी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी फक्त व्यापारी नफा मिळवत नसून सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे सांगितले. 

         डाॅ. दत्ता पाटील पुढे म्हणाले, ``संस्थेचा जर पाया मजबूत असेल तर त्या संस्थेचे लवकरच वटवृक्षात रूपांतर होते. स्पष्टता व पारदर्शकता तसेच एकीच्या भावनेचा सुंदर मिलाफ रवळनाथ हाऊसिंग मध्ये असल्याने संस्थेची भरभराट झाल्याचे सांगितले. 

     अध्यक्षीय भाषणात एम. एल. चौगुले यांनी सभासद, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून चंदगड शाखेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात चंदगड शाखाही पुरस्काराला पात्र ठरेल असे गौरवोद्गार  काढले. कोरोना संपल्यावर रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचा रौप्य महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, पं. सचे वरिष्ठ सहाय्यक तानाजी सावंत यांना शाहू पुरस्कार व  पत्रकार नंदकुमार ढेरे यांना प्र. के. अत्रे पुरस्कार मिळाल्याबदल तसेच मुख्याध्यापक अर्जुन गावडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    सूत्रसंचालन डॉ. आर. एम. साळुंके यांनी केले. आभार व्यवस्थापाक दत्ताराम मायदेव यांनी मानले. यावेळी शाखा व्यवस्थापक दिपक शिंदे, प्रा. जी. एस. पाटील, निहाल नाईक आदीसह कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.

No comments:

Post a Comment