द्वादशी दिवशी चंदगडमध्ये अवतरली अक्षरपंढरी, ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्गाला उत्तम प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2021

द्वादशी दिवशी चंदगडमध्ये अवतरली अक्षरपंढरी, ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्गाला उत्तम प्रतिसाद



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

ते आले त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकून घेतलं सारं.....

          हो अगदी असचं आज घडलं. सकाळी ९ वाजल्यापासून ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आला. चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व इंग्लिश टिचर असोशिएशन तर्फे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अफलातून प्रतिसाद मिळाला.

      विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे त्याचे हस्ताक्षर .. जे कधीही क्षर होत नाही... नष्ट होत नाही... ते म्हणजे अक्षर... आजच्या संगणकाच्या युगातही सुंदर अक्षराचे महत्व तितकेच जास्त टिकून राहिले आहे ..सुंदर अक्षर म्हणजे आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे ..आणि ही ओळख देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची अक्षरं घडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते अक्षरमित्र अमित भोरकडे   मंगळवेढा, ता पंढरपूर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत   मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध करून टाकले.

       अक्षरांपासून जसं सुंदर वाक्य बनतं. अगदी तसचं आज अमित भोरकडेनी अक्षरांच्याच माध्यमातून माणूस जोडण्याचं तंत्र सांगितलं. आज अक्षरशः दोन तास चंदगड तालुक्यातील शिक्षणप्रेमी अक्षर पंढरीत तल्लीन झाले होते. पाहूण्यांचे स्वागत आणि परिचय सुभाष बेळगांवकर यांनी केले.  शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी या ऑनलाईन मराठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे कौतुक केले. पंचायत समिती मार्फत शुभेच्छा दिल्या.  लॉकडाऊन नंतर लवकरच अमित भोरकडे यांची ऑफलाईन कार्यशाळा भरविण्याचा मनोदय व्यक्त केला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षराचा वसा घ्यावा असे आवाहन केले. या कार्यशाळेत माजी प्राचार्य ए. एस. पाटील, श्री सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. जी. तुपारे, शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी एस. डी. पाटील, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर, संजय पाटील, बसवंत चिगरे, अलबादेवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. बागे, फौजी पाटील, कु. नीलम पाटील, कु. सुयोग धस, गजानन नांदवडेकर यांनी प्रश्नोत्तरात सहभाग घेतला. या कार्यशाळेत तालुक्यातील विद्यार्थी पालक व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

         या विद्यार्थ्यांच्या लेखणीला सुंदर हस्ताक्षराची गोडी लावण्यासाठी चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व इंग्लिश टीचर असोसिएशन यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार इंग्लिश टीचर असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. ओऊळकर यांनी मानले.



No comments:

Post a Comment