अडकूरच्या पुरातन शिवमंदिराचा ठेवा जपण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2021

अडकूरच्या पुरातन शिवमंदिराचा ठेवा जपण्याची गरज

अडकूर येथील शिवमंदिर परिसरात असलेले पुरातण अवशेष

अडकूर / एस. के. पाटील
          अडकूर (ता. चंदगड)  या गावामध्ये कोल्हापूर - चंदगड या राज्य मार्गालगत झाडीमध्ये असणाऱ्या पुरातन शिवमंदिराची पडझड चालू आहे. अगदी अमूल्य असा असणारा पुरातण ठेवा जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
        गडहिंग्लज वरून नेसरी आणि येथून अडकूरला राज्य मार्ग क्रं. १८९ जातो. अडकूरच्या मुख्य बस स्टॅडच्या उत्तरेला गर्द झाडीमध्ये शिवमंदिर वसले  आहे.  तसेच निसर्गाच्या गर्द झाडीमध्ये वसलेले शिवाचे देवालय पाहून मन भारावून जाते. पण या  पुरातन मंदिराची झालेली भग्न अवस्था, तुटलेले व अस्त्यावस्थ पडलेल्या विरगळी पाहून मन सुन्न होते.
         मंदिराच्या बाहेरील बाजूस भग्न झालेला नंदी ठेवला आहे. या नंदीच्या गळ्यामध्ये घुंगुरमाळा दिसतात. हा नंदी अखंड शिळेचा आहे. त्यावर कोरलेल्या घुंगुरमाळा अगदी स्पष्टपणे दिसतात. या नदीच्या अगदी समोर गाभाऱ्याकडे  जाण्यासाठी काही पायर्‍या लागतात.
 कदाचित हा त्या काळातील सभामंडप किंवा नंदीमंडप असावा. सध्या येथे नवीन नंदीची स्थापना करण्यात आली आहे. या नंदीच्या समोर कासव देखील आहे. मुख्य गाभार्‍याच्या समोर अनेक मुर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पूर्वीची श्री गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला देवतेची मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोर नवीन मूर्ती बसवलेली आहे. तसेच भग्न स्वरूपाच्या मुर्त्या येथे दिसतात. गाभार्‍याच्या मध्ये शिवपिंडीची स्थापना करण्यात आली असून कमलमंडलातून सतत पाण्याच्या धारा शिवपिंडीवर पडत असताना दिसतात. 
         सभामंडपामध्ये मंदिराचे भग्नावशेष रचून ठेवण्यात आले आहेत. त्यात एका बाजूला सप्तमातृका असाव्यात असे वाटते. तसेच काही कीर्तिमुखे ही दिसतात मंदिराच्या समोरील बाजूस अनेक विरगळ आणि सतीशिळा दिसतात. वीरगळ म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रम दाखवणारी शिळा यावरून युद्धभूमीवर पराक्रम केल्यानंतर वीरांची महती कोरलेली दिसते. अशा अनेक शिळा येथे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. आपल्या पूर्वजांचा हा अनमोल इतिहास कुठेतरी जतन करून ठेवणे गरजेचे आहे. या विरगळ कित्येक वर्षांपासून या चिंचेच्या झाडाखाली उघड्यावर असल्याने त्या जीर्ण होत जात आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूस झाडाखाली काही शिळा दिसतात. त्या भग्न अवस्थेत  दिसतात.
          निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेले हे शिवाचे मंदिर आज लोप पावण्याच्या मार्गावर आहे. अडकूर गावांमध्ये असणाऱ्या  हा पुरातन वास्तू ठेवा जपून ठेवला पाहिजे.

      अडकूर येथील शिवमंदिर पुरातन आहे. या मंदिराचा व येथे असलेल्या सर्व पुरातन वास्तूचा गुप्त राजवट, वाकाटक राजवट व कदंबा राजवटीशी घनिष्ठ संबंध आहे. यासंदर्भातील संशोधन केले असून या पुरातन वास्तूचे जतन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रा. डॉ. नंदकुमार गावडे यांनी व्यक्त केले.




No comments:

Post a Comment