कर्यात भागात ओढ्याचे पाणी शिवारात! कालकुंद्री, कुदनूरात शेकडो एकर जमीन व पिकांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

कर्यात भागात ओढ्याचे पाणी शिवारात! कालकुंद्री, कुदनूरात शेकडो एकर जमीन व पिकांचे नुकसान

किटवाड ओढ्याच्या पाण्यामुळे कालकुंद्री-कुदनुर दरम्यान अर्धा किलोमीटर पर्यंत असे रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

              अतिवृष्टीमुळे किटवाड ओढ्याचा  प्रवाह बदलल्यामुळे कालकुंद्री कुदनूर गावच्या शिवारातील शेकडो एकर जमीन व त्यावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंडिंग विभागाने गरज नसताना ओढ्यात ठीक ठिकाणी बांधलेल्या काँक्रीट बंधाऱ्यांमुळे दरवर्षी या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

            होसूर व कर्नाटक मधील हांदिगनूर कडून येणाऱ्या दोन मोठ्या ओढ्यांवर किटवाड नजीक कृष्णा खोरे योजनेतील  धरणे बांधण्यात आली आहेत. किटवाड गावा खाली संगम होऊन हे दोन्ही ओढे एकत्रितपणे पुढे वाहतात त्यामुळे प्रवाह दुप्पट असतो. तो सहा किलोमीटर अंतरावर दुंडगे नजिक ताम्रपर्णी नदीला मिळतो.  दोन्ही धरणातील पाणी उन्हाळ्यात आळीपाळीने याच ओढ्यातून खाली सोडले जाते. ते मोटर पंप द्वारे शेतकरी पिकांना सोडतात. असे सगळे व्यवस्थित सुरू असताना बंडिंग विभागाने गरज नसताना या सहा किलोमीटर अंतरात ठीकठिकाणी काँक्रीट बंधारे बांधून ओढ्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण केले आहेत. यामुळे धरणे भरल्यानंतर येणारा पाण्याचा प्रवाह दरवर्षी मार्ग बदलत आहे. हे पाणी काठावरील शिवारात घुसून जमिनी वाहून जात आहेत तर पाण्याबरोबर आलेल्या गाळाखाली भात आदी ऊभी पिके गाडली जात आहेत. यात कालकुंद्री हद्दीतील नुकसान मोठे आहे. संबंधित विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे तुटपुंजी जमीन धारक शेतकऱ्यांवर गंडांतर येत आहे. वाहून गेलेली जमीन हजारो रुपये खर्च करून शेतकरी नव्याने बनवतात पण पुराचे शुक्लकाष्ट थांबत नाही.

          हेच पात्र बदललेले  पाणी मध्यम पावसातही कालकुंद्री ते कुदनुर दरम्यानच्या सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्यावरून ओसंडून वाहते व वाहतूक खंडित होते, पाण्याच्या प्रवाहामुळे शेती व पिकाच्या नुकसानी बरोबरच रस्ता खचून धोकादायक बनला आहे. याचा शासनाच्या संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करून बुडीत व नुकसान झालेल्या शेतीसाठी सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment