पावसाची संततधार सुरुच, दुपारनंतर काहीसा जोर ओसरला, पुरस्थिती जैसे थे, चंदगड-गडहिंग्ल व चंदगड-बेळगाव मार्ग बंद, कोवाड बाजारपेठ महापुराच्या विळख्यात - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2021

पावसाची संततधार सुरुच, दुपारनंतर काहीसा जोर ओसरला, पुरस्थिती जैसे थे, चंदगड-गडहिंग्ल व चंदगड-बेळगाव मार्ग बंद, कोवाड बाजारपेठ महापुराच्या विळख्यात

चंदगड शहराच्या काॅलेज रोडवर पाणी सुमारे तीन ते चार फुट पाणी आल्याने रोडवरील घरामध्ये पाणी आले होते. नागरीक पुराचे पाणी पाहण्यासाठी गेले होते.

संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

           जिल्ह्यासह तालुक्यात पावसाची दमदार बँटींग सुरुच आहे. काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने चंदगड शहराचा इतर गावांशी व जिल्हाशी संपर्क तुटला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. अडकूर पुलावर पाणी आल्याने हा देखील मार्ग बंद आहे. चंदगड शहरात कॉलेज रोडवर पुराचे पाणी आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. कोवाड येथे बाजारपेठ अर्धी पाण्यात गेल्याने नागरीकांचे स्थलांतर करावे लागले. सायंकाळी गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी कोवाड येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेत पाणी वाढत असल्याने बाजारपेठेतील नागरीकांनी आपल्या कुटुंब व साहित्यासह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशा सुचना केल्या. 

चंदगड शहराच्या शिवारालगत असलेल्या बिल्डींगच्या खालच्या मजल्यापर्यंत पाणी शिरले होते. 

शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या रिंगरोडवर असलेल्या शिवारातील घरे अशी अर्धी पाण्यात बुडाली होती. 


चंदगड - हेरे मार्गावर पुराचे पाणी आल्याने पिके पाण्याखाली गेली होती. 



चंदगड - हेरे मार्गावरील माजी सरपंच मांद्रेकर यांच्या घरात पुराचे पाणी आले होते. 

चंदगड काॅलेज रोडवर नागरीकांना सुचना देताना पोलिस.

  चंदगड शहराच्या बाजुने गेलेल्या रिंगरोडला लागून असलेल्या शिवाराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. संपुर्ण पिके पाण्याखाली गेली होती. पिकांच्या वरुन पाच फुट पाणी वाहत होते. चंदगड-हेरे मार्गावर असलेल्या माजी सरपंच मांद्रेकर यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतर केले. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही वेळानंतर मोठ-मोठ्या थेंबांच्या सरीसर सरी कोसळत असल्यामुळे पाऊस गेलेल्या वेळेतील पाण्याची पातळी भरुन काढत होता. २०१९ च्या महापुराच्या आठवणी ताज्या असतानाच तिसऱ्या वर्षी पुन्हा महापुर आल्याने लोकांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये भिवून न जाता एकमेकाला मदत करत या नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे गरजेचे आहे. 

चंदगड बेळगाव मार्गावरील दाटे येथे रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग बंद

      

चंदगड बेळगाव राज्य मार्गावरील दाटे येथे पुराचे पाणी आल्याने रस्त्यावरील घरे जवळपास पुर्णता पाण्यात बुडाली होती. 

        ताम्रपर्णी नदीला आल्येल्या महापुरामुळे दाटे गावामध्ये मध्यरात्री तीनही बाजूने पाणी शिरल्याने घरातील प्रापंचिक साहित्य जनावरे सुतार लोकांनी बनवल्येल्या गणपती मूर्ती तसेच हॉटेल व किराणा दुकान मधील साहित्याचे नुकसान झाले असून काही साहित्य हलवण्यास मध्यरात्री पासून सुरुवात झाली आहे. २०१९ पेक्षाही दोन दिवसातील पडलेल्या पावसाचे प्रमाण जास्त असून पुर रेषा ओलांडली आहे. या महापुरामुळे बेळगांव वेंगुर्ला राज्यमार्ग वाहतूक रात्री पासून बंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दाटे बेळेभाट रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे ऊस भात त्याबरोबरच इतर पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड सुरू झाली आहे. विद्युत पुरवठा व दूरध्वनी सेवा सुध्दा खंडित झाल्यामुळे दाटे गावाचा संपर्क तुटला आहे.                              (बातमीदार – उदयकुमार देशपांडे)


कोवाड येथील बाजारपेठेत सकाळच्या टप्यात बाजारपेठेत शिरलेले पाणी

         

         प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचे जनतेला आवाहन........

       चंदगड- धरण क्षेत्र व पाणलोटक्षेत्रात संतत धार पाऊस सुरु असलेने घटप्रभा, झाबरे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या सर्व लोकांनी प्रशासन सुचना देईल, त्याप्रमाणे तातडीने स्थलांतरित व्हावे. विशेषत: सडेगुडवळे, फाटकवाडी, पुन्द्रा, कानुर बु, कानुर खु, पिळणी, भोगोली, हिंडगाव, चंदगड शहर, कोनेवाडी, धुमडेवाडी, निटूर, किणी, कोवाड, दुंडगे, कुरणी, दाटे, बेळेभाट, आसगाव, हंबीरे, कानडी, माणगाव, कामेवाडी, घुलेवाडी बसर्गे, चिचंणे, कुदनुर, जट्टेवाडी, नरेवाडी तांबुळवाडी, कालकुन्द्री, राजगोळी बु या गावातील लोकांनी. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. तसेच नदी नाले ओढ्यांना पूर येऊन ज्या गावात पाणी पसरत आहे. त्या गावातील तातडीने स्थलांतरित करावे. नागरिकांनी गंमत म्हणून पुराचे पाणी पाहण्यासाठी घरातून बाहेर पडू नये. पाण्याच्या प्रवाहाला खूप वेग आहे. त्यामुळे दुर्घटना होऊ शकते. असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे. 

चंदगड तालुक्यातील पावसाची सर्कलनिहाय आकडेवारी......

चंदगड तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी २६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्कलनिहाय पाऊस असा सर्कलचे नाव, आजची आकडेवारी कंसात १ जून २०२१ पासून आतापर्यंतची आकडेवारी – चंदगड - २९८ (१४४६), नागनवाडी – २१६ (१००४), माणगाव – २८० (६७८), कोवाड – १७२ (६२५), तुर्केवाडी - २९० (१२६९), हेरे – ३१० (१६८८८). तालुक्यामध्ये आतापर्यंत सर्व सर्कलमध्ये ६७१० मिलीमीटर पावासाची नोंद झाली असून सरासरी १११८.३३ एवढी आहे. 

चंदगड तालुक्याच्या प्रकल्पातील पाणीसाठा............

मध्यम प्रकल्प – जांबरे (१००). लघुपाटबंधारे प्रकल्प – दिंडलकोप (१००), कळसगादे (१००), किटवाड क्र. १ (१००), किटवाड क्र. २ (१००), सुंडी (१००), काजिर्णे (१००) हे प्रकल्प शंभर टक्के भरले असून अन्य प्रकल्प अर्धे अधिक भरले आहेत. काही प्रकल्प ९० टक्केपर्यंत भरले आहेत. 

No comments:

Post a Comment