कवितेचे नाव - 'माझी बाय', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2021

कवितेचे नाव - 'माझी बाय', कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावलेली सुंदर कविता

 कवितेचे नाव 'माझी बाय'

          कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय आयोजित, कविता लेखन स्पर्धेत पाचवा क्रमांक विजेती; एका आजीने आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी केलेले कष्टसाध्य कार्य (महात्म्य) अधोरेखित करणारी हृदयस्पर्शी सुंदर कविता.                 माझी बाय 


हनुवटीवरचं फुल, कपाळावरचं गोंदण 

ठिपक्यांची रांगोळी, सारवलेलं अंगण


लुकलुकत्या नजरेआड, संसाराचं गुपित 

काळाच्या वनवासातली, सीता ती शापित


हजारभर सुरकुत्या, मऊशार कातडीवर 

कठोर जीव तोलून धरलाय, थरथरत्या काठीवर


प्रत्येक श्वास, रुतून बसलाय दगडाच्या भिंतीत

फुटलेल्या कौलांवरनं, भेगाळलेल्या मातीत 


माया पेरून, सरींमध्ये मोठं केलंय संसारझाड 

संस्कारांचं कुंपण करून, डोळे पुसत पदरा आड 


लेकरांच्या संसारावर किरपा कर आई 

खणानारळानं ओटी भरीन शबुद ती देई


माजघरातले दिवे लावून, शोधत गोठ्यात वासरू गाय

पाठीवरनं हात फिरवत उभी राही, माझी माय,    'माझी    बाय'!

                                                       कवी -  विनायक तुकाराम पाटील 

कालकुंद्री, ता. चंदगड
            

1 comment:

Ba_su.96k said...

Motivational 👀✨

Post a Comment